गडचिरोली - केरळमध्ये गर्भवती हत्तीणीला स्फोटक टाकलेले अननस खाऊ घालून ठार केल्याच्या घटनेनंतर देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याच पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यातही दररोज कितीतरी रानटी डुकरं व इतर प्राण्यांची शिकार केली जाते. पिठाच्या गोळ्यामध्ये किंवा कोणत्याही खाद्य पदार्थांमध्ये गावठी बॉम्ब मिसळवून ठेवले जाते. तेच खाद्य पदार्थ रानटी डुकर खातो तेव्हा तो चावताच त्याच्या जबड्यामध्ये बॉम्ब स्फोट होतो आणि डुकराचा मृत्यू होतो. अशाचप्रकारे अनेक प्राण्यांची क्रुरपणे पद्धतीने शिकार केली जाते. याला आळा घालण्यासाठी वनविभागाने प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.
राज्यात सर्वाधिक म्हणजे 76 टक्के वनक्षेत्र असलेला गडचिरोली हा एकमेव जिल्हा आहे. असे असले तरी जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्या नगण्यच आहे. जिल्ह्यातील घनदाट जंगलातून वाघ कधीचाच गायब झाला. लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून एखादा वाघ स्थलांतरित झाल्यास जिल्ह्याच्या सीमा भागातील झुडपी जंगलात त्याचे दर्शन होते. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात रानटी डुकरांचा मोठा अधिवास पाहायला मिळतो. त्याचबरोबर हरिण, रानगवा, नीलगाय, चितळ, ससा, सांबर या प्राण्यांचाही अधिवास आहे. जिल्ह्यातील आदिवासी परंपरेनुसार वन्यप्राण्यांची शिकार करून आपली उपजीविका भागवत आले आहेत. आता काही वर्षांपूर्वीच वन्यप्राण्यांच्या शिकारीवर शासनाने बंदी घातली असली, तरी आजही गोपनीयरित्या मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांची शिकार केली जात आहे.
कशी केली जाते शिकार? -
शिकारी वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी विशेष पद्धतीचा वापर करतो, ज्यात वन्यप्राणी अलगद अडकतात. रानटी डुकरांच्या शिकारीसाठी सर्वप्रथम त्यांचा वावर कुठल्या भागात आहे, हे त्यांच्या पाऊल खुणांवरून तपासले जाते. त्यानंतर पिठाच्या गोळ्यामध्ये किंवा कोणत्याही खाद्य पदार्थांमध्ये गावठी बॉम्ब मिसळवून ठेवले जाते. तेच खाद्य पदार्थ रानटी डुकर खातो तेव्हा तो चावताच त्याच्या जबड्यामध्ये स्फोट होतो आणि डुकराचा भयानक पद्धतीने मृत्यू होतो.