गडचिरोली- नागपूर वेधशाळेने पुढील 3 दिवस विदर्भातील 6 जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश आहे. गेल्या 3 दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून या अतिवृष्टीमुळे आधीच जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका उद्भवू नये, म्हणून गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी स्वतःच्या अधिकाराचा वापर करत 6 व 7 सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालय व अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
शेखर सिंह, जिल्हाधिकारी गडचिरोली हेही वाचा-रत्नागिरीत पावसाची संततधार सुरूच; चिपळूण, दापोलीमध्ये ढगफुटीसारखा पाऊस
नागपूर वेधशाळेने पुढील 3 दिवस 6 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला असून नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा या 6 जिल्ह्यात 7 सप्टेंबर रोजी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मागील 48 तासात कमी कालावधीत सर्वाधिक पाऊस गडचिरोली जिल्ह्यात झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी 6 आणि 7 सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा-रायगडात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता, जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
तसेच पुलावरुन पाणी वाहत असताना कोणत्याही नागरिकांनी जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. भामरागड मधील पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून तहसील व पोलीस प्रशासनाच्या मदतीने खबरदारी बाळगली जात आहे. पूरग्रस्तांना कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तसेच महसूल भवन येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.