गडचिरोली - अवकाळी पावसाने शहराला शुक्रवारी पुन्हा झोडपले. मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने शहरवासीयांची मोठी तारांबळ उडाली होती.
गडचिरोली शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे काढणीला आलेले रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 21 मार्च या काळात गारपीट आणि पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. ही शक्यता शुक्रवारी खरी ठरली. सायंकाळी तीन ते चार वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात वादळी वाऱ्यासह गारपीटीच्या पावसाने हजेरी लावली. सुमारे 15 ते 20 मिनिट झालेल्या या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.