गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. तर इतरही लहान नाल्यांना पूर आल्याने भामरागडसह अहेरी, सिरोंचा, मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या तालुक्यातील भ्रमणध्वनी व वीज सेवाही गेल्या दोन-तीन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस; शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटला - आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद
भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. तर इतरही लहान नाल्यांना पूर आल्याने भामरागडसह अहेरी, सिरोंचा, मुलचेरा आणि एटापल्ली तालुक्यातील शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. या तालुक्यातील भ्रमणध्वनी व वीज सेवाही गेल्या दोन-तीन दिवसापासून बंद आहे.
शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत पाऊस सुरू असल्याने घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. छत्तीसगड राज्यातील जगदलपुर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. येथील ठेंगणा पूल पाण्याखाली गेल्याने भामरागडचा अल्लापल्लीशी संपर्क तुटलेला आहे. तसेच गड-अहेरी नाल्यालाही पूर आल्याने अहेरी-आलापल्ली मार्ग बंद आहे. तसेच चौडमपल्ली नाल्याला पूर आल्याने आलापल्ली-चंद्रपूर तसेच सिरोंचा मार्गावरील अनेक नाल्यांना पूर आल्याने आलापल्ली-सिरोंचा मार्गही बंद आहे.
वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने मोठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे देसाईगंज येथील रेल्वेच्या भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक बंद पडली आहे. तर वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील गोविंदपुर नाला तसेच शिवनी नाल्याची पाणी पातळी वाढत असून हा मार्गही बंद होण्याच्या मार्गावर आहे.