गडचिरोली- जिल्ह्यात 27 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्याला मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. येथील अनेक शेतकऱ्यांची पाळीव जनावरे तुडुंब भरलेल्या नाल्यात वाहून गेली आहेत. मुलचेरा तालुक्यात आतापर्यंत 688 मिलिमीटर म्हणजेच 93 टक्के पाऊस झाला आहे.
पाळीव जनावरे पुरात गेली वाहून; पावसामुळे मुलचेरा तालुक्याला मोठा फटका
जिल्ह्यात 27 जुलैपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुलचेरा तालुक्याला मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. येथील अनेक शेतकऱ्यांचे पाळीव जनावरे तुडुंब भरलेल्या नाल्यात वाहून गेले आहेत.
29 जुलैला गोमणी नाल्याला पूर आल्यामुळे या नाल्यालगत असलेल्या चिचेला आणि चिचेला टोला येथील मोजी संन्याशी आत्राम, नामदेव लक्ष्मण चौधरी यांची गाय पुरात वाहून गेली. चरायला गेलेल्या गायी घरी न आल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, पूर ओसरल्यावर 30 जुलै रोजी त्या गायी गावालगत असलेल्या नाल्यातच मृतावस्थेत आढळून आल्या. लगाम साजा मधील दामपूर येथील मल्लेश आसन्ना बुरमवार यांचे दोन रेडे दामपूर नाल्यात वाहून गेले. त्यातील एक मृतावस्थेत मिळाला. तर याच गावातील वेंकटेश आसन्ना बुरमवार यांचाही एक रेडा मृतावस्थेत आढळून आला.
दामपूर येथील हनमंतु रामय्या बिटपल्लीवार यांचा गायीचा गोटा पूर्णपणे कोसळला आहे. तर गोमणी साजा अंतर्गत असलेल्या मुखडी येथील राधाबाई राजू आसमवार यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे. पूल्लीगुडम गावातही दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुसळधार पावसामुळे पूल्लीगुडम जवळील नाला दुथडी भरून वाहत असल्याने चरायला गेलेले बैल पुरात वाहून गेले. त्यामुळे नामदेव सीताराम तिग्गा या शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले आहे. एकंदरीत मुसळधार पावसाचा मुलचेरा तालुक्याला मोठा फटका बसला आहे.