गडचिरोली - जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी जिल्ह्यात भेट दिली. पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करा ; पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश - eknath shinde news
गडचिरोली जिल्हयात सध्या पूरस्थिती असून प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभुमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला भेट दिली. पूर ओसरल्यानंतर झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करुन नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
पालकमंत्री एकनाथ शिंदे त्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीआधी जिल्हयातील कनेरी, पारडी या भागातील पूरस्थितीची पाहणी करत पूरग्रस्तांची भेट घेतली. पारडी येथील शाळेतील निवारा गृहाला भेट देवून पुरग्रस्तांना सोयी सुविधांबाबत विचारपूस केली. सद्या अजून पूरस्थिती 24 ते 48 तास कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे व त्यांना जीवनावश्यक साहित्य देणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. या पूरस्थितीमुळे घरांचे, शेतीचे, जनावरांचे तसेच अन्य प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूर ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे सुरु करुन आवश्यक मदत द्यावी असे निर्देश त्यांनी अधिकारी वर्गाला दिले.
जिल्हयात कोरोनासह नागरिकांना पूरस्थितीलाही सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीत नागरिकांना प्रशासन सर्वोतोपरी मदत करत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले आहे. यावेळी त्यांनी जिल्हयाच्या सिमारेषेवरील रस्त्याच्या दुतर्फा पुराच्या पाण्याची पाहणी केली. तसेच शहरातील नागरिकांशी संवाद साधून पुरस्थितीबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी दिपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, पारडी गावचे सरपंच संजय निखारे व अन्य अधिकारी उपस्थित होते.