गडचिरोली -जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरीही कोरोनाच्या तीसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे निर्देश नगरविकास, तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक आज व्हीसीद्वारे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा -ठार झालेल्या दोन नक्षलवाद्यांवर होते 14 लाखांचे बक्षीस
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. मात्र, अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानुसार कोरोनाची तीसरी लाट लवकरच येणार असल्याने, जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम तातडीने पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यातील 10 तालुक्यांसाठी मंजूर केलेले 10 ऑक्सिजन जनरेशन प्लांट तातडीने पूर्ण करण्याची सूचना शिंदे यांनी प्रशासनाला केली. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांशी दिवसातून 2 वेळा तरी संपर्क साधण्यासही सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कोरोना स्थितीविषयी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली. ऑनलाइन बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.
म्युकरमायकोसिस आजारासाठी सज्ज रहा
कोरोनाच्या तीसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, लहान मुलांसाठी खास वॉर्ड तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. त्यासोबतच सध्या राज्यात वेगाने वाढत असलेल्या म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य रोगासाठी लागणारी सर्व सज्जता करण्याच्या सूचना शिंदे यांनी केल्या. या रोगात रुग्णांचा मृत्यूदर जास्त असल्याने जिल्ह्यात याचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणेला सज्ज राहण्यास सांगितले. या रोगाची औषध महाग असल्याने त्यांचा पुरेसा साठा आधीच करून ठेवावा, असेही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत पाचशे इंजेक्शनची ऑर्डर दिल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील लसीकरणाची परिस्थिती जाणून घेताना या भागातील आदिवासी लोकांच्या मनात या लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्याचे शिंदे यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर उपाय म्हणून व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेऊन आदिवासींच्या मनातील ही भिती दूर करण्याचे प्रयत्न करा, असंही शिंदे यांनी स्पष्ट केले.
मान्सून परिस्थितीचा पालकमंत्री शिंदे यांच्याकडून आढावा
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील मान्सून परिस्थितीचा आढावा देखील यावेळी घेण्यात आला. जिल्ह्यातील नागरिकांना 3 महिन्यांचा रेशन पुरवठा करणे, सर्पदंश आणि विंचूदंश यावरील औषधांची व्यवस्था सर्व तालुक्यांतील आरोग्य केंद्रात करून ठेवणे. जिल्ह्यातील गरोदर महिलांना सुरक्षित ठिकाणी आणून ठेवणे, अशी सर्व मान्सूनपूर्व कामे वेळीच पूर्ण करावीत. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करावा लागणारा औषधांचा पुरवठा येत्या 15 दिवसांत करून ठेवावा, आशा सूचनाही पालकमंत्री शिंदे यांनी बैठकीत जिल्ह्या प्रशासनाला केल्या.
हेही वाचा -काँग्रेसच्या माजी आमदार पुत्राची कोविड सेंटरमधील डॉक्टरला मारहाण