गडचिरोली - येथील गोंडवाना विद्यापीठाकडून ऑनलाईन परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र, परीक्षेदरम्यान तांत्रिक अडचण उद्भवल्याने सकाळी 9 वाजताचा पेपर रद्द करत दुपारी 2 वाजता ठेवण्यात आला. मात्र, यावेळीही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने पेपरच रद्द करावा लागला. त्यामुळे आता 5 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या सगळ्या ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षा आणि मुल्यमापन मंडळाने घेतला आहे.
राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षेचा प्रयोग करण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपुर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना ग्रुप ऑनलाइन परीक्षा द्यायची होती. तर अकरा ठिकाणी ऑफलाइन सेंटर सुरू करण्यात आले होते. सकाळी नऊ ते सव्वा-दहाच्या दरम्यान पहिला पेपर होता. मात्र, पहिल्या ऑनलाइन पेपरला अनेक ठिकाणी इंटरनेटमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. अनेक विद्यार्थ्यांना लॉग-इन करता आले नाही. तर सर्व्हर सुरू न झाल्याने ही बाब अनेकांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला मोबाईलवर कॉल करुन कळवली.