गडचिरोली- मुलींच्या शिक्षणासाठी निवासाची सोय करून सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र, शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासत विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सिरोंचा येथील शासकीय वसतिगृहात समोर आला आहे. येथील विद्यार्थिनींच्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला.
सिरोंचा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शासकीय अनुसूचीत जाती (नवबौध्द) मुलींसाठी निवासी वसतिगृह आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय अनु.जाती मुलींच्या 81 निवासी शाळा आहेत. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात 2 शाळा आहेत. एक अहेरी-वांगेपल्ली येथे व दुसरी सिरोंचा येथे आहे. सिरोंचा येथील शासकीय शाळेत गेल्या सात दिवसांपासून अळ्या असलेले निकृष्ट जेवन विद्यार्थिनींना दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.