गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यात नद्या कायम वाहत्या असतात. या नद्यांच्या पाण्याचा योग्य वापर करून, गट शेतीच्या माध्यमातून जिल्ह्यातील पीक क्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील खरीप हंगामाबाबत, आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
'शेतकऱ्यांनी आपली अर्थिक सुबत्ता वाढवावी'
गडचिरोली जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या ४५ टक्के आहे. गट शेतीमधून पीक पद्धती निवडणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे, यासह शेतमाल विक्री करण्यासाठीही याचे बरेच फायदे आहेत. जिल्ह्यात १.६७ लक्ष हेक्टर खरीप, ०.६७ लक्ष हेक्टर रब्बी, तर उन्हाळी ०.०२३ लक्ष हेक्टरवर पेरणी होते. या आकडेवारीमध्ये आणखी वाढ करून शेतकऱ्यांनी आपली अर्थिक सुबत्ता वाढवावी, असेही शिंदे म्हणाले. या खरीप बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, खासदार अशोक नेते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, कृषि अधीक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तालुकास्तरावरील कृषी अधिकारी उपस्थित होते.
'विकेल ते पिकेल या योजनेला जोड द्यावी'
जिल्ह्यातील पारंपारिक शेतीमध्ये आजच्या 'विकेल ते पिकेल' या योजनेला आधुनिकतेची जोड देवून नव-नवे प्रयोग सुरू करावेत. हे केल्याने नव्या पीक पद्धतीची शेती व्यवसायाला जोड मिळेल. जिल्ह्यात सध्या भात, कापूस, तूर, हरभरा, जवस, मका या पिकांना प्राधान्य आहे. यामध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फूड, नागली, तेल बीया असे नवे प्रयोग सुरू केले आहेत. परंतु, यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात वाढ करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तसेच, जिल्ह्यात औषधी वनस्पतीमध्येही वाढ करता येईल. चांगल्या दर्जाची बियाणे वापरून व रासायनिक खतांचा कमी वापर करून, शेतीमध्ये त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येते. यासाठी नियोजन करावे असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.
'सिंचन क्षेत्रात वाढ करावी'
सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने सुचवल्याप्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांना इंजिन, मोटर तसेच, तुषार सिंचन यासाठी योजना आखावी. यामधून निश्चितच सिंचन क्षेत्र व लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास मदत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. या बैठकीत खासदार अशोक नेते व आमदार महोदयांनी आपले विषय व समस्या मांडल्या. तसेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. भाऊसाहेब बऱ्हाटे (कृषी अधीक्षक गडचिरोली) यांनी यातील नियोजनाबाबत व जिल्ह्यातील उपक्रमांबाबत यावेळी सादरीकरण केले.
हेही वाचा -वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी पोलिसांची समुद्रात गस्त