महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Girl Carried On Cot : उपचारासाठी बांबूच्या खाटेवरुन तब्बल २५ किमी पायपीट; गडचिरोलीच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर - खाटेची कावड करून दवाखान्यापर्यंत

Girl Carried On Cot : छत्तीसगडच्या एका युवतीला खाटेच्या कावडवरून तब्बल २५ किलोमीटर पायपीट करत गडचिरोलीतील लाहेरीत उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

Girl Carried On Cot
Girl Carried On Cot

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2023, 11:17 AM IST

Updated : Sep 3, 2023, 11:22 AM IST

पहा व्हिडिओ

गडचिरोली :Girl Carried On Cot : गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर भामरागड हा अतिदुर्गम तालुका आहे. या तालुक्यात आरोग्य सुविधांअभावी रुग्णांची परवड होणे सामान्य आहे. मात्र आता येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे येथील आरोग्यव्यवस्थेच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

खाटेच्या कावडवरून २५ किलोमीटर पायपीट : भामरागड तालुक्याला छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या भागात आरोग्याच्या पुरेशा सुविधा नसल्याने येथील नागरिक उपचारासाठी नेहमीच भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे येतात. परिसरात रस्ते व पुलांचा अभाव असल्याने रुग्णांना जंगलातील पायवाटेनं खाटेची कावड करून दवाखान्यापर्यंत आणावं लागतं. १ सप्टेंबरला अशाच प्रकारे छत्तीसगडच्या एका युवतीला खाटेच्या कावडवरून तब्बल २५ किलोमीटर पायपीट करत लाहेरीत उपचारासाठी दाखल करण्यात आलं. याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ही बाब उघडकीस आली.

मुलीची प्रकृती स्थिर : छत्तीसगड राज्यातील मेटावाडा हे गाव डोंगराळ भागात आहे. या गावातील पुन्नी संतू पुंगाटी (वय १७ वर्ष) ही युवती मागील पाच दिवसांपासून तापानं फणफणत होती. त्यामुळे तिला तिच्या कुटुंबीयांनी खाटेवर टाकून सुमारे २५ किमीचा पायदळ प्रवास करत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. त्यानंतर तिच्यावर तात्काळ उपचार करण्यात आला. आता तिची प्रकृती स्थिर आहे.

लोकांना पायी जाण्याशिवाय पर्याय नाही : 'पावसाळ्यामुळे या भागात मलेरियाचे प्रकरणं वाढत आहेत. सध्या छत्तीसगडच्या चार ते पाच सीमावर्ती गावांतील रुग्ण लाहेरी येथं उपचार घेत आहेत. त्यांच्यासाठी छत्तीसगडमधील नारायणपूर पेक्षा लाहेरी आरोग्य केंद्र अधिक जवळ आहे', असं स्थानिक अधिकाऱ्यानं एका वृत्तसंस्थेला सांगितलं. या भागात रस्ते व पुलांच्या अभावामुळे अनेकांना दवाखान्यापर्यंत येताना खूप यातना सहन कराव्या लागतात. ही गावे डोंगराळ प्रदेशात वसलेली आहेत. येथे मोटारीयोग्य रस्ते नाहीत. तसेच नेटवर्क कनेक्टिव्हिटीही खराब आहे. त्यामुळे या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आता या समस्येकडं लोकप्रतिनिधी कधी लक्ष देतील, हा मोठा प्रश्न आहे.

हेही वाचा :

  1. Dead Body On Bike : आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानं पित्यानं दुचाकीवरून नेला मुलाचा मृतदेह...
Last Updated : Sep 3, 2023, 11:22 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details