गडचिरोली - वायफाय चौपाल प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील इंटरनेटची समस्या मार्गी लागणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून भारत नेट प्रकल्पांतर्गत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्राम पातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून सीएससी व बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये सदर प्रकल्प राबविला जात आहे.
जिल्हाधिकारी यांची प्रकल्पाला भेट-
पहिल्या टप्प्यात सदर प्रकल्पात कुरखेडा, वडसा, आरमोरी गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा या तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत पर्यंतची मुख्य जोडणी 100% पूर्ण झालेली असून आता ग्रामपंचायत मधून गावातील प्रत्येकी पाच शासकीय कार्यालयांना या इंटरनेटची जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. या जोडणी मध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य देण्याची निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून सी एस सी ला देण्यात आले होते. त्याअंतर्गत झालेल्या कामाचे अवलोकन करण्याकरिता जिल्हाधिकारी यांनी स्वतः आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव येथे भेट दिली.
तसेच आरमोरी तालुक्यात इंटरनेट जोडणी करिता सीएससी वाय-फाय चौपाल कार्यक्रमांतर्गत सीएससी केंद्र संचालक पराग हजारे यांच्या केंद्रात प्रस्थापित केलेल्या मिनी ओईलटीची सुद्धा पाहणी केली. या भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कार्य प्रगतीवर समाधान व्यक्त केले.