गडचिरोली- गेल्या १ मे रोजी भूसुरुंग स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले होते. या घटनेला कुरखेड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी हुतात्मा जवान तौसीफ शेख यांचा भाऊ शेख आसिफ शरीफ यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गडचिरोली नक्षली हल्ला : '१५ हुतात्मा जवानांच्या मृत्यूस एसडीपीओ शैलेश काळेच जबाबदार, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा' - गडचिरोली नक्षली हल्ला
गेल्या ३१ मे च्या रात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी २७ वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे दादापूर येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी या १५ सैनिकांना त्या ठिकाणी तत्काळ पाठवले. मात्र, जवानांच्या सुरक्षे्ची कोणतीही दक्षता घेण्यात आली नसल्याचा आरोप जवानांच्या नातेवाईकांनी केला आहे.
गेल्या ३१ मे च्या रात्री दादापूर येथे नक्षलवाद्यांनी २७ वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे दादापूर येथे गेले होते. त्यानंतर त्यांनी या १५ सैनिकांना त्या ठिकाणी तत्काळ पाठवले. मात्र, जवानांच्या सुरक्षेची कोणतीही दक्षता घेण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिसरात नक्षल्यांनी असा प्रकार घडवून आणल्यानंतर त्या घटनास्थळी जाण्यापूर्वी परिसरातील २० ते २५ किलोमीटरच्या परिसराची तपासणी केली जाते. पोलीसाच्या भाषेत याला 'रोड ओपनिंग' म्हणतात. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे हे वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांचा आदेश प्राप्त होताच जवान जायला निघाले. मात्र, पोलीस वाहन उपलब्ध नसल्याने सर्व जवानांना खासगी वाहनातून प्रवास करावा लागला. त्याचवेळी नक्षल्यांनी घडवलेल्या भूसुरुंग स्फोटात १५ जवानांना वीरमरण आले.
दादापूर येथे या १५ सैनिकांना पाचारण करण्यापूर्वी बॉम्ब शोध पथक वाहन पुढे असणे गरजेचे होते. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. तसेच बेकायदेशीरपणे आदेश देऊन ते त्या १५ सैनिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे यांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. तसेच १५ हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनावर पाठोडा येथील शहीद जवानाचे वडील शेख उस्मान, आई शेख शमीम आरिफ, पत्नी अंजूम तौसीक, भाऊ नझीम आरिफ, सय्यद अन्सार अरमान, तोहेर मोहिद्दीन आदींची स्वाक्षरी आहे.