गडचिरोली -अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मंगळवारी (ता. ९) छत्तीसगड राज्यात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे. निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून मतदान पथके हेलिकॉप्टर, खासगी वाहने, बसगाड्याद्वारे मतदान केंद्रावर पोचवण्यात आल्या आहेत.
गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणातून कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करून रवाना करण्यात येत आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त व संवेदनशील असल्याने निवडणुकीवर नक्षल्यांचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात यापूर्वीच 'स्पेशल फोर्स' तैनात करण्यात आले आहेत. दुर्गम भागातील मतदान केंद्रावर मतदान पथकांना सुरक्षितपणे पोहोचता यावे, यासाठी दोन हेलिकॉप्टरच्या तसेच खाजगी वाहने व बस गाड्यांच्या मदतीने त्यांना मतदान केंद्रावर दोन दिवसांपूर्वीच रवाना करण्यात आले आहेत.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात १ हजार ८७१ मतदान केंद्र असून गडचिरोली, आरमोरी, आमगाव, अहेरी या चार विधानसभा क्षेत्रामध्ये सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर चिमूर, ब्रह्मपुरी या विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. भामरागड, एटापल्ली, कोरची, धानोरा आदी नक्षलग्रस्त तालुक्यातील दुर्गम भागातील मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरच्या मदतीने मतदान पथकांना पोहोचविण्यात आले आहेत. गडचिरोली पोलीस दलाकडे वायुसेनेचे दोन हेलिकॉप्टर दोन दिवसांपूर्वीच दाखल झाले.
९ एप्रिल रोजी छत्तीसगड येथे नक्षल्यांनी केलेल्या आयडी बॉम्बस्फोटात भाजपच्या एका आमदारासह चार पोलीस जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत हायअलर्ट जारी करण्यात आले आहे. गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणातून कर्मचाऱ्यांना मतदान साहित्याचे वाटप करून रवाना करण्यात येत आहे. एकूणच मतदानाची तयारी पूर्ण झाली असून मतदान शांततेत पार पडावे, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न आहेत.