गडचिरोली - जिल्ह्याबाहेरून आलेल्या मजूर, विद्यार्थी, प्रवासी व इतर नागरिकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, अशी विनंती जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यांनी सोमवारी जिल्ह्यातील आरमोरी येथे संस्थात्मक विलगीकरण केलेल्या लोकांशी संवाद साधला.
पालकमंत्री वडेट्टीवारांचा संस्थात्मक विलगीकरणातील लोकांशी संवाद, सहकार्याचे आवाहन - Gadchiroli corona news
संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्व नागरिकांनी पालकमंत्र्यांना 'आम्हाला घरी जाऊ द्या, आम्ही घरात स्वतंत्र राहतो', अशी मागणी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांना 'तुम्हाला 14 दिवसांनंतर घरपोच सोडण्यात येईल; काळजी करू नका, घाबरू नका, प्रशासनाला सहकार्य करा. आपला जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे. तो ग्रीन झोनमध्येच राहण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे,' अशी विनंती नागरिकांना केली.
जिल्ह्यात १८ हजार मजूर आणि इतर लोकांना संस्थात्मक आणि गृह विलगीकरणात ठेवले आहे. या ठिकाणी येथील नागरिकांसाठी केलेल्या सुविधांची पाहणी त्यांनी केली. आरमोरी येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतीगृह आणि प्रिती आदिवासी माध्यमिक आश्रमशाळेमध्ये ठेवलेल्या जिल्ह्याबाहेरील मजूर, विद्यार्थी व प्रवाशांशी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष भेटून चर्चा केली. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सुविधा यामध्ये जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, शौचालयाची व्यवस्था आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. उपस्थित नागरिकांनी केलेल्या व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
TAGGED:
Gadchiroli corona news