गडचिरोली -जिल्ह्यात नवीन शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एक आढावा बैठक घेतली. राज्यस्तरीय समिती आणि जिल्हा समितीबरोबर चर्चेनंतर पुढील वर्षी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या मानकानुसार 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याकरता आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध आहेत. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
राज्यस्तरीय समिती सदस्यांसोबत पालकमंत्र्यांनी चर्चा केली फेब्रुवारी महिन्यात डॉ. राजेंद्र सूरपाम यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने निरीक्षण करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण संचालकांना पाठवण्यात आला होता. हाच अहवाल मंगळवारी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मोरे, डॉ. राजेंद्र सूरपाम आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी काहीही अडचण सद्य:स्थितीत नाहीत. नवीन पदनिर्मितीकरून आणि प्रतिनियुक्तीने पदभरती करून गडचिरोली येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालय 2021 पर्यंत सुरू होऊ शकते. त्यासाठी आवश्यक निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी 32 एकर जागा उपलब्ध असून त्यामध्ये काही अडचण नाही. बाह्यरूग्ण सेवा, अपघात विभाग, अति दक्षता विभाग तसेच इतर विभागासह 2 व्याख्यान कक्षांची आवश्यकता आहे. यापैकी व्याख्यान कक्ष इमारतीचे बांधकाम करावे लागेल. खाटांची आवश्यकता 300 असून सद्या 406 उपलब्धता आहेत. विद्यार्थ्यांसाठी 60 क्षमतेचे वसतिगृह आवश्यक असून तेही उपलब्ध आहे. महाविद्यालयासाठी एकूण शैक्षणिक कामासाठी 103 मनुष्यबळ आवश्यक असून त्याची पदनिर्मिती किंवा प्रतिनियुक्ती करावी लागणार आहे.
गडचिरोली सारख्या आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास आदिवासी नागरिकांना सोयीचे होणार आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, चंद्रपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे, प्राध्यापक डॉ. राजेंद्र सूरपाम, मुख्य प्रशासकीय अधिकारी संजीव राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल रुडे हे उपस्थित होते.