गडचिरोली: कोरोना संसर्गामूळे गेल्या वर्षभरात संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. अशावेळी कित्येक मजूरांना हाताला काम नव्हते. जिल्ह्यात अशा वेळी मनरेगातून राज्याकडून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा जास्त मनुष्य दिवस मजूरांना काम देवून एक प्रकारे मजूरांना दिलासाच दिला. यासह गडचिरोली जिल्हा मनरेगातील कार्याबाबत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला.
5 वर्षांत प्रथमता: महत्तम उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश -
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे मुलभूत उद्दिष्ट अकुशल हातांना काम उपलब्ध करुन देणे हे आहे. सन 2020-21 या वर्षात जिल्ह्यात प्रत्यक्ष कार्यरत 2 लाख 93 हजार 101 ॲक्टिव्ह मजूरांपैकी 1 लाख 92 हजार 344 इतक्या मजुरांच्या हातांना काम देण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अन्य रोजगार बंद असतांना मनरेगा मजुरांच्या मदतील धावून गेली असून जिल्हा प्रशासनाने जास्तीत जास्त अकुशल कामांचे नियोजन करुन प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन दिला.
मनरेगामध्ये 60:40 असा अकुशल व कुशल कामांचा रेशो असतांना 7594.26 लक्ष रुपये अकुशल स्वरुपाच्या कामावर खर्च करण्यात आला असून 1524.67 लक्ष रुपये कुशल स्वरुपाच्या कामावर खर्च करण्यात आला. त्यानुसार हे प्रमाण (84:16) असे येते. सन 2020-2021 करिता गडचिरोली जिल्हृयात 24.51 लक्ष मनुष्य दिन निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 31 मार्च 2021 अखेरीस जिल्ह्याने 34.57 लक्ष मनुष्य दिन निर्मिती केली आहे. लक्ष्यांकाच्या तुलनेत 141.07 इतके उद्दिष्टपूर्ती आहे. मागील 5 वर्षात प्रथमता: इतके महत्तम उद्दिष्ट पूर्ण करण्यात यश आले आहे.
नव्या वर्षात 457 ग्रामपंचायती मध्ये 62 हजार 707 कामाचे नियोजन-
जिल्ह्यातील एकूण कार्यरत जॉब कार्डची संख्या 1लाख 24 हजार 487 असून त्यामध्ये 2 लाख 93 हजार 101 कार्यरत मजूर आहेत. गेल्या 2020-21 या वर्षात 1 लाख 92 हजार 344 मजूरांना रोजगार देण्यात आला. यातून जिल्ह्यात 34 लाख 19 हजार 366 मनुष्य दिवस निर्माण करण्यात आले. राज्यात दुसऱ्या क्रमांकावर जिल्हा असून एकूण उद्दिष्टाच्या तब्बल 141.07 टक्के अधिकचे काम पूर्ण करण्यात जिल्हा प्रशासनाला यश मिळाले आहे. सन 2020-21 मध्ये जिल्ह्यात 7594.26 लक्ष रुपये अकुशल कामगारांना मजूरी अदा करण्यात आली. जिल्ह्याचे 24 लाख 50 हजार 720 मनुष्य दिवसाचे उद्दिष्ट असताना 34 लाख 19 हजार 366 मनुष्य दिवस मनरेगातून काम मिळवून देवून प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळात मजूरांना दिलासा दिला आहे.