गडचिरोली -भामरागडमध्ये आलेल्या महापुरामुळे येथील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. सतत चार ते पाच दिवस भामरागडसह तालुक्यातील अनेक गावे पाण्याखाली होती. सध्या पूर ओसरला असून येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ५५ पथके रवाना केली आहेत. या पथकाद्वारे मदत तसेच नुकसानीचे सर्वेक्षण करून पुढील दोन-तीन दिवसात पुरग्रस्तांना आर्थिक मदत जाहीर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
हेही वाचा - मुसळधार पावसाने सातव्यांदा तुटला भामरागडचा संपर्क ; पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करणारा चमू अडकला
जिल्हाधिकारी म्हणाले, भामरागडला यावर्षी सातवेळा पुराचा फटका बसला आहे. छत्तीसगड राज्यात तसेच भामरागड तालुक्यात पडलेल्या पावसामुळे पर्लकोटा, पामुलगौतम व इंद्रावती या तिन्ही नद्यांना महापूर आला. हा पूर १९९४ नंतरचा सर्वात मोठा पूर होता. या पुराची अगोदरच माहिती मिळाल्याने येथील अडीच हजाराहून अधिक नागरिकांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आता पूर ओसरला असून भामरागडसह अनेक गावांमध्ये चिखल झाल्याने आरोग्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ जिल्हा आरोग्य विभागाचा चमू भामरागड मध्ये पाठवण्यात आला असून या यात १५ डॉक्टरांचा समावेश आहे.