गडचिरोली- गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार आहे. या क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास हेच आपले ध्येय आहे. विकासाच्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित आहे, असा विश्वास महाआघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
महाआघाडीचे उमेदवार नामदेव उसेंडी यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर
देशातील लोकशाही व घटना कायम राहावी, यासाठी निवडणूक होत आहे. गेल्या ५ वर्षात भाजप सरकारने लोकशाहीला धोक्यात आणले. दिलेली आश्वासने पाळली नाही. त्यामुळे गेल्या ५ वर्षात महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढले. शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांना कवडीमोल भावाने धान्य विकावे लागत आहे. याच धानाला काँग्रेस सरकारच्या काळात ३ हजार रुपये भाव होता. तर सध्या २ हजार रुपये क्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना धान्य विकावे लागत आहे, असेही उसेंडी म्हणाले.
स्थानिक खासदाराने रेल्वे, आरोग्य, शिक्षण या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, एकाही आश्वासनांची पूर्तता केली नाही. केवळ आपली पोळी भाजण्याचे काम स्थानिक खासदाराने केले. आपल्या शिवकृपा संस्थेमार्फत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार त्यांनी केला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' असे पंतप्रधान मोदी म्हणत असले तरी गडचिरोली येथे संस्थेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावरून 'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभानल्ला' अशी परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले.
सिंचन मुद्यावरुन टीका -
सिरोंचा तालुक्यात मेटीगट्टा सिंचन प्रकल्प तेलंगणा सरकारकडून बांधला जात आहे. या प्रकल्पाला सिरोंचा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. तरीही भाजप सरकारने तेलंगणा सरकारला प्रकल्प बांधण्याची परवानगी दिली. या प्रकल्पासाठी पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली झाली आहे. हा प्रकल्प सिरोंचा तालुक्यासाठी कर्दनकाळ ठरणार आहे. एकीकडे पर्यावरणाची मान्यता नसताना सिंचन प्रकल्पाला मान्यता द्यायची. मात्र, जिल्ह्यातील रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना पर्यावरणाची मंजुरी नाही म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे, असे धोरण भाजप सरकारकडून सुरू आहेत.
गोंडवाना विद्यापीठाला जागा नाही -
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या गोंडवाना विद्यापीठाला अद्यापही जागा मिळालेली नाही. चंद्रपूर जिल्ह्यात विद्यापीठाच्या उपकेंद्राला जागा सहज प्राप्त होते. मात्र, गडचिरोलीत नाही. यावरुन गडचिरोलीत नाममात्र विद्यापीठाची इमारत उभी करून विद्यापीठाचा कामकाज चंद्रपुरातून चालवण्याचा डाव भाजप सरकारकडून सुरू आहे. याला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. खासदार १५ हजार कोटींचे काम आणल्याचा दावा करीत असले तरी आपल्या जनसंपर्क कार्यालयासमोरील रस्त्याची अवस्था त्यांना दिसत नाही. मग पंधरा हजार कोटी रुपयांचे रस्त्याचे काम कुठे करण्यात आले, याचा हिशोब त्यांनी द्यावा, असेही ते म्हणाले.
आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असून जिल्ह्यातील जल, जंगल, खनिज यावर आधारित उद्योग जिल्ह्यात स्थापन व्हावे, यासाठी आपला प्रयत्न राहील. तसेच जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकास यावर आपला भर राहील. त्यामुळे भाजपची घरवापसीची वेळ आली आहे आणि ती नक्की होणार असेही उसेंडी म्हणाले.