गडचिरोली - राज्यातील मोजक्या कोरोनामुक्त जिल्ह्यांच्या यादीत मागास समजल्या जाणाऱ्या गडचिरोलीचा समावेश आहे. कोरोनाला जिल्ह्यात शिरकाव न करू देण्यास आरोग्य-महसूल-पोलीस-स्थानिक स्वराज्य संस्था हे प्रशासकीय घटक यशस्वी झाले आहेत.
ग्रीन झोन गडचिरोली : जिल्हा 'असा' राहिला कोरोनामुक्त, गडचिरोली प्रशासनाचे यश केंद्र व राज्य सरकारने दिलेल्या कोरोना प्रतिबंधक उपायांची काटेकोर अंमलबजावणी केली गेली. या जिल्ह्यात कोरोनासंबंधी दिशानिर्देश जारी झाल्यावर लगेच जिल्ह्याबाहेरच्या-परराज्यातील व परदेशातून आलेल्या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील सुमारे 17 हजार लोकांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला, तर याच व्यक्तींची आशा वर्करच्या माध्यमातून नियमित आरोग्य निरीक्षणे नोंदविण्यात आली.
जिल्ह्यातील अहेरी येथे आणीबाणीच्या काळातील मॉकड्रील आयोजित करत यंत्रणेची क्षमता देखील तपासण्यात आली. प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवली गेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठीची वेळ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मर्यादित करण्यात करण्यात आली. यामुळे गर्दीला पायबंद बसला. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ नऊ कोरोना नमुने चाचणीसाठी प्रलंबित आहेत, तर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केल्याने अकारण बाहेर फिरणाऱ्यांना चाप बसला आहे. जिल्ह्यात 25 व्हेंटीलेटर असून मास्क- पीपीई किटसह सर्वच आरोग्य साधनांची उपलब्धता करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाबाबत गडचिरोली जिल्ह्यातील माहिती -
२२ एप्रिल -
- एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- ००
- आत्तापर्यंत एकूण क्वारंटाईन - १०४
- क्वारंटाईन कालावधी पूर्ण - ९१
- अजून निरीक्षणाखाली असलेले - १३
- पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये - ९
- घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले - ४
- आज तपासणीसाठी नमुने घेतले- ४
- एकूण नमुने तपासणी- ६९
- पैकी निगेटीव्ह - ६०
- नमुने तपासणी अहवाल बाकी- ०९