गडचिरोली- महाराष्ट्र दिनी नक्षल्यांनी कुरखेडा-कोरची मार्गावरील लेंढारी नाल्यावर भूसुरुंग स्फोट घडवून आणला. या स्फोटात १५ पोलीस जवानांना वीरमरण आले. तर, एक खासगी चालकाचाही मृत्यू झाला. या घटनेच्या तिसऱ्या दिवशीही या परिसरात पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. शुक्रवारी सकाळी घटनास्थळी AK-४७ बंदुकीचे भरलेले २ मॅगझीन या परिसरात आढळून आले.
गडचिरोलीत घटनास्थळावर सापडले AK-४७ चे भरलेले २ मॅगझीन
दादापूर येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी लावलेले बॅनर आजही जैसे थे आहेत.
दुसरीकडे दादापूर येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी लावलेले बॅनर आजही जैसे थे आहेत. महाराष्ट्र दिनाच्या पहाटे पुराडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील दादापूर येथे नक्षल्यांनी २७ वाहनांची जाळपोळ केली होती. या घटनेची चौकशी करण्यासाठी कुरखेडा येथील विशेष कृती दलाचे जवान खासगी वाहनाने जात असताना लेंढारी नाल्यावर नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणला. यात १५ जवान व एका खासगी वाहन चालकाला वीरमरण आले. या घटनेनंतर २ दिवसापासून कुरखेडा-कोरची मार्ग बंद आहे. आज तिसऱ्या दिवशी हा मार्ग सुरू झाला असला तरी रस्त्यावरील भूसुरुंग स्फोटाचा खड्डा जैसे थे असल्याने चारचाकी वाहनांना मार्ग बंद आहे. तर केवळ दुचाकी या मार्गाने जात आहे.
दुसरीकडे भूसुरुंग स्फोट घडवून आणल्यानंतर त्याच रात्री पुन्हा नक्षलवाद्यांनी दादापूर येथे वीस ते पंचवीसच्या संख्येने नक्षली बॅनर लावले. हे बॅनर आजही गावात जैसे थे आहेत. या घटनेची चौकशी केली जात असून घटनेला जबाबदार कोण? दोषींवर नक्कीच कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांनी मानवंदना कार्यक्रमात स्पष्ट केले होते. त्यामुळे खासगी वाहनाने पोलीस जवानांना पाठवणारे कुरखेडा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.