महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भामरागड चौथ्या दिवशीही पाण्याखालीच; गोसीखुर्दचे पाणी सोडल्याने पुन्हा पुराचा धोका - भामरागड पूर

छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी पात्र सोडले. पुराचे पाणी भामरागड गावात शिरले. त्यामुळे येथील शेकडो घरे पाण्याखाली गेली.

भामरागड चौथ्या दिवशीही पाण्याखालीच

By

Published : Sep 9, 2019, 11:55 AM IST

गडचिरोली- जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व छत्तीसगडमध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड लगतच्या पर्लकोटा व पामुलगौतम नदीला पूर आला. या दोन्ही नद्यांनी भामरागडला वेढा घातला असून येथील 70 टक्के घरे चार दिवसांपासून पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील इतर भागातील पूर ओसरला असला तरी सोमवारी सकाळी गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आल्याने वैनगंगा नदी फुगली असून जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.

जिल्ह्यात पाच सप्टेंबरपासून सतत चार दिवस मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल प्रमुख २० मार्ग पुरामुळे बंद पडले होते. तर गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीला पूर आल्याने या पुरामुळे उपनद्याही फुगल्या. परिणाम अनेक राष्ट्रीय महामार्ग बंद पडले. रविवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले. त्यामुळे सर्व मार्ग सुरू झाले. मात्र, भामरागड मधील पुरस्थिती चौथ्या दिवशीही कायम आहे.

भामरागड चौथ्या दिवशीही पाण्याखालीच

हेही वाचा - VIDEO पाहा : हेलिकॉप्टरमधून टिपलेले चित्तथरारक दृश्य, गडचिरोली जिल्ह्यात पाणीच पाणी...

छत्तीसगड राज्यात झालेल्या पावसामुळे पर्लकोटा व पामुलगौतम या दोन्ही नद्यांनी पात्र सोडले. पुराचे पाणी भामरागड गावात शिरले. त्यामुळे येथील शेकडो घरे पाण्याखाली गेली. येथील पाचशे ते सहाशे नागरिकांना यापूर्वीच सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून तहसीलदार कैलास अंडील व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी त्यांच्या राहण्याची व जेवण्याची व्यवस्था केली आहे. आजही भामरागड गावांमध्ये पाणी असून पूर ओसरण्यास आणखी एक दिवस लागणार असल्याची शक्यता आहे. येथील वीज व भ्रमणध्वनी सेवा पूर्णता टप्प आहे.

हेही वाचा - गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती : 17 मुख्य रस्ते बंद, शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

तर, दुसरीकडे संजय सरोवराचे पाणी सोडल्यामुळे गोसीखुर्द धरणाचेही दरवाजे दोन मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणातून 13 हजार 739 क्युसेस पाणी विसर्ग होत असून वैनगंगा नदीला पूर येऊन पुन्हा जिल्ह्यातील प्रमुख मार्ग बंद होण्याची शक्यता बळावली आहे. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पूरस्थिती असलेल्या गावांमध्ये बचाव पथकाकडून काम सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details