गडचिरोली- राज्य सरकारने हमीभाव योजनेअंतर्गत धानाला 1, 868 रुपये हमीभाव आणि 700 रुपयांचे बोनस जाहीर केला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाचे धान खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. टोकण दिले जात असल्याने जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी होत आहे.
सरकारने 'अ' प्रतीच्या धानासाठी 1, 868 रुपये हमीभाव तर 700 रुपये बोनस जाहीर केला आहे. गतवर्षी 1, 815 रुपये हमीभाव व 700 रुपये बोनस होता. हे दर बाजार समितीच्या दरापेक्षा जास्त असल्याने गतवर्षी अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला होता. यावर्षी बाजार समितीत दर घसरलेले आहेत. त्यामुळे शेतकरी हमीभाव योजनेतून विक्रीसाठी गर्दी करीत आहेत.
यावर्षी प्रथमच टोकण पद्धती -
गेल्यावर्षी धान विक्रीसाठी नेताना शेतकऱ्यांना मार्केटिंग फेडरेशनमध्ये जमिनीचा सातबारा देऊन नंबर लावावा लागत होता. यामध्ये काहीजण चिरीमिरी घेऊन शेतकऱ्यांचे नंबर लावून देत होते. यामधून अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी बाजार समितीमध्ये टोकण पद्धती सुरू करण्यात आली आहे. बाजार समितीमध्ये सातबारा दिल्यानंतर टोकन दिले जात आहे. या टोकणनुसार शेतकऱ्यांना धान विक्रीला आणण्यासाठी मोबाईलवर संदेश पाठविला जाणार आहे.