गडचिरोली - जिल्ह्यातील अहेरी येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय स्थापन करण्यात यावे, या मागणीसाठी वकील संघाने 27 जानेवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन केले आहे. अहेरी-सिरोंचा येथील वकिलांनी केलेल्या या आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम दिसून येत आहे. तर या आंदोलनाला भाजपने समर्थन दिले आहे.
अहेरी हा स्वतंत्र जिल्हा आहे. त्याच धर्तीवर येथे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाची मागणी सुरू आहे. यासाठी अहेरी उपविभागातील सर्वच तालुकास्थानी असलेल्या वकील संघांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली येथे अहेरी उपविभागातील नागरिकांना पोहोचण्यासाठी पूर्ण दिवस घालवावा लागतो. मात्र, अहेरी येथे रस्तामार्गे पोहोचणे नागरिक आणि वकिलांना सोयीचे जाते.
अहेरी उपविभागातील अहेरी-एटापल्ली-सिरोंचा-मुलचेरा-भामरागड या तालुक्यातील नागरिकांना पैसा, वेळ वाचविण्यासाठी अहेरी हे ठिकाण केंद्रस्थानी ठरते. यामुळेच अहेरी आणि सिरोंचा येथील वकिलांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायालयाची मागणी केली आहे.