गडचिरोली- जिल्ह्यातील शहरी भागात नागरिक कोरोनाविषयी विशेष खबरदारी बाळगताना दिसत नाही. मात्र, दुब्बागुडा या आदिवासी बहुल गावातील नागरिकांनी गावात कोणालाही प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. तसेच गावाच्या वेशीवर बैलगाडी आडवी ठेवून परवानगी शिवाय आत येऊ नये, असे बॅनर लावले आहे. त्यामुळे या गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भाऊ, दुरूनच राम राम..! आमच्या गावात येऊ नका; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुब्बागुडा गावात प्रवेशबंदी - कोरोना भारत
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र, नागरिक त्याचे पालन करता रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. शहरी भागात हा प्रकार जास्त प्रमाणात घडत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील दुब्बागुडा या आदिवासी बहुल गाव सूचनांचे काटेकोरपणे पाल करत आहे.
दिवसेंदिवस कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत चालले आहेत. सध्या शहरी भागात कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्यास भविष्यात ग्रामीण भागात देखील ही साथ पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे सर्वांना खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. महसूल, पोलीस आणि नगर पंचायत प्रशासनाने दिलेल्या सूचनेचे दुब्बागुडा ग्रामस्था काटेकोरपणे पाल करत आहेत. तसेच २२ मार्चच्या जनता कर्फ्युमध्ये सहभागी झाल्यानंतर आता २१ दिवसाचा देशव्यापी बंद देखील पाळणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच गावात कोणीही येऊ नये, असे बॅनर लावण्यात आले आहे. कोरोना विषाणूबाबत बाहेरच्या नागरिकांना गावात बंदी घालणारे हे जिल्ह्यातील पहिले गाव आहे.