गडचिरोली - भामरागड तालुक्यातील विसमुंडी या आदिवासी गावात तब्बल 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज जोडणी करण्यात आली आहे. गुरुवारी तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते विसमुंडी येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. विसमुंडी येथील गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आनंदाचा क्षण साजरा केला.
हेही वाचा - सौर ऊर्जेवरील दुहेरी नळयोजनेमुळे मेडपल्ली, हेमलकसामध्ये दिवसभर पाणीपुरवठा
विसमुंडी या अदिवासी बहुल गावातील नागरिकांसाठी हा खरा तर क्रांतीचा दिवस होता. एकिकडे भारत हा महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे. तशी ध्येय धोरणे आखत देश वाटचाल करत असताना या गावात मात्र, स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी वीज जोडणी केली जाते. लोकांच्या आशेचा प्रकाश तब्बल 70 वर्षांनी पल्लवीत होत आहे.
उद्घाटन प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम, तलाठी राममूर्ती गड्डमवार, कोतवाल दौलत तलांडेसह गावकरी उपस्थित होते. जिल्हा नियोजन व विकास योजनेतून गावाचे विद्युतीकरण तसेच सौभाग्य योजनेतून पाच वर्षापूर्वीच कामे हाती घेतली होती. परंतु, अर्धवट काम करून संबंधीत ठेकेदार बेपत्ता झाले होते. त्यामुळे काम रखडले. याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अंधाराचा सामना करावा लागत होता.
गावकरी तहसीलदारांना भेटल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला. याची दखल घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला गती आणण्याचे आदेश दिले होते.