गडचिरोली- बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 23 मे'ला गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयामध्ये 25 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान पार पडले होते. राज्यात सर्वाधिक 71 टक्के मतदान गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात झाले होते. या मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात होते. या पाचही उमेदवारांची आता धाकधूक वाढली आहे. सर्वप्रथम 25 फेर्यांमध्ये ही मतमोजणी होणार असून त्यानंतर वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील एकूण पाच मतदान केंद्रावरच्या 5 व्हीव्हीपॅट मतांच्या मुद्रित पावत्यांची प्रत्यक्ष मोजणी होणार आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यामधील मतांचा आकडा आल्यानंतरच अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे निकालाला सायंकाळ होण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. मतमोजणीच्या प्रत्येक टेबलवर तीन कर्मचारी याप्रमाणे साडेचारशे कर्मचारी काम पाहणार आहेत. तर इतर अधिकारी व कर्मचारी असे सहाशे ते सातशे जण मतमोजणीसाठी उपस्थित राहणार आहेत.