गडचिरोली - दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. भामरागड लगतची पर्लकोटा नदी धोकाच्या पातळीवर आहे. तर, आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने यावर्षी पाचव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर, पर्लकोटा नदीवरील पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
27 जुलैला चार दिवस झालेल्या पावसाने पर्लकोटा नदीला पूर आल्याने पहिल्यांदा भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर रस्ता सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने दुसऱ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. पुन्हा 6 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंधरा दिवसात तिसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. यानंतर चौथ्यांदा पुन्हा तीन दिवस संपर्क तुटला होता.