गडचिरोली- ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात म्हणून ते आजही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात राहून सर्व जगाच्या पुढे आहेत, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी गडचिरोली येथे केले. आज धानोरा येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आपला वाढदिवस साजरा केला यावेळी ते बोलत होते.
विद्यार्थिनींसोबत शाळेत कापला केक-
गडचिरोली जिल्ह्यासारख्या भागात जावून आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्याची आंतरिक इच्छा आज पूर्ण झाली आहे. धानोरा येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आज झालेला जन्मदिनाचा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असून कोरोनानंतरच्या शाळेच्या सत्राला आजच्या कार्यक्रमाने सुरुवात होत आहे, याचा आनंद आहे. दुर्गम भागात ऊन, वारा, पाऊस तसेच कोरोना न बघता विद्यादान येथील शिक्षकांनी सुरू ठेवल्याचे मला मनस्वी समाधान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधीनस्त असलेल्या कार्यालयांच्या आढाव्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आलेल्या महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी आज गडचिरोली येथे नागपूर विभागातील जिल्हा माहिती अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नागपूर-अमरावती विभागाचे संचालक हेमराज बागूल यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, प्रवीण टाके, मनीषा सावळे, सचिन अडसूळ, अनिल गडेकर उपस्थित होते.
विद्यार्थिनींशी साधला संवाद-
दुपारच्या सत्रात मेंढा गावाला व धानोरा येथील आदिवासी मुलींच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. पांढरपट्टे यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी म्हणून धुळे आणि सिंधुदुर्ग येथे कार्य केले आहे. सव्यसाची लेखक, जाणिवेचे सनदी अधिकारी यासोबतच एक प्रथितयश गझलकार म्हणून ते ख्यातीप्राप्त आहेत. यंदाचा आपला जन्मदिन त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये साजरा करण्याचे ठरविले होते. त्यानुसार हा उपक्रम पार पडला. यावेळी धानोरा येथील शाळेत मुलींनी पारंपरिक रेला नृत्य करीत त्यांचे स्वागत केले. डॉ. पांढरपट्टे यांनी सर्व मुलींना यावेळी शैक्षणिक साहित्यही भेट म्हणून दिले, मुलींशी संवाद साधला.
मेंढा गावातील ग्रामस्थांशी चर्चा-
'आमच्या गावात आम्हीच सरकार' या संकल्पनेवर आधारित असलेल्या लेखा मेंढा या गावाला भेट देवून ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांची त्यांनी यावेळी माहिती घेतली. लेखा मेंढाच्या सरपंच नंदा दुगा यांनी गावाविषयीच्या कामकाजाची व ग्रामसभेबद्दलची माहिती दिली. यावेळी सचिवांनी गावातील परिसर पाहिला तसेच गोटूलला भेट देवून त्याठिकाणची प्रक्रिया समजून घेतली. तसेच गावातील तेल कांडप व चारोळी प्रकल्पास भेट देवून कामांची माहिती घेतली. लेंखा मेंढा गावात झालेल्या कार्यक्रमाला सरपंचांसह ग्रामसभेचे अध्यक्ष अलीराम हिचामी, ग्रामसभा सचिव चरणदास तोफा, नरेश कुमोटी, मनिराम दुर्गा, आकांक्षित जिल्हा प्रतिनिधी सुधाकार गवंडगावे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.