गडचिरोली - मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या नैराश्यातून सोमवारी दुपारी रवींद्र वरगंटीवार यांनी सहकुटुंब आत्महत्या केली होती. या घटनेबाबत कळताच अपराधीपणाच्या भावनेतून त्यांची मुलगी आणि जावयानेही चामोर्शीलगतच्या पोर नदीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना या घटनेची आधीच शक्यता वाटत असल्याने त्यांनी तत्परता दाखवून या दोघांचेही प्राण वाचवले. सध्या दोघांवर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांची प्रतिक्रिया... हेही वाचा - हृदयद्रावक! प्रेमसंबंधातून मुलीचा पळून जाऊन विवाह, आई-वडिलांसह भावाने केली आत्महत्या
सोमवारी दुपारी रवींद्र वरगंटीवार यांनी पत्नी वैशाली (43) आणि मुलगा साईरामसह (19) विहिरीत उडी घेऊन सामुहीक आत्महत्या केली होती. या घटनेच्या धक्क्याने नवविवाहीत दाम्पत्यानेही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सायंकाळच्या सुमारास मुलगा घराबाहेर पडल्याने भयभीत होऊन त्याच्या आईने गडचिरोली पोलीस ठाणे गाठले आणि यासंदर्भात माहिती दिली. त्यामुळे पोलीस मोबाईलच्या लोकेशनव्दारे या दाम्पत्याच्या मागावर होते.
हेही वाचा - फेसबूकवरचे प्रेम शिक्षिकेला पडले महागात, 55 लाखांचा गंडा
पोलीस नदीवर पोहोचले तेव्हा ते दोघेही पुलावर उभे होते. मात्र, त्यांना शंका येऊ नये म्हणून पोलीस वाहन घेऊन समोरून निघून गेले. त्यानंतर ते पुन्हा परत आले. तेव्हा हे दाम्पत्य एक ऑडिओ क्लिप व्हायरल करून उडी मारण्याच्या तयारीत होते. त्याच क्षणी पोलीस वाहनातून उतरले आणि त्यांनी मुलाचा हात पकडला. मात्र, तोवर मुलीने नदीत उडी मारली होती. तेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनीही नदीत उडी मारून मुलीला सुरक्षित बाहेर काढले. नदीत उडी मारण्यापूर्वी दोघांनीही विष घेतल्याची शंका असल्याने त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.