गडचिरोली- कुरखेडा व चामोर्शी तालुक्यात कोरोनाचे ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे सतर्कतेचा भाग म्हणून प्रशासनाने जिल्ह्यातील १० ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. पोलिसांनी सोमवारी संध्याकाळी ही ठिकाणे प्रतिबंधीत केली असून, नागरिकांचे आवागमन बंद करण्यात आले आहे.
सोमवारी संस्थात्मक विलगीकरणात असलेले कुरखेडा तालुक्यातील ४ व चामोर्शी तालुक्यातील १ असे एकूण ५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली. प्रशासनानेही कठोर पावले उचलत निर्बंध आणखी कडक केले. याचाच एक भाग म्हणून कुरखेडा शहरातील शासकीय मुलांचे वसतिगृह परिसर, शासकीय मुलींचे वसतिगृह परिसर, गांधीवॉर्ड, येंगलखेडा हे संपूर्ण गाव, नेहारपायली हे संपूर्ण गाव, चिचेवाडा हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.
शिवाय चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा परिसर व लगतचा निवासी भाग, मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर गावच्या उत्तरेकडे सुखदेव प्रल्हाद व शेखर गोविंदा मंडल यांच्या घराजवळचा परिसर, विश्वनाथनगर येथील दक्षिणकेडे संतोष राजन सरकार व नवीन नित्यानंद सरकार यांच्या घराजवळचा परिसर, तसेच विश्वनाथनगर येथील पूर्वेकडे दीपक दत्ता व जोदुनाथ राजन मिस्त्री यांच्या घराजवळचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.