महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नक्षलग्रस्त बिनागुंडात कोविड-19 लसीकरण यशस्वी; कोतवालाच्या आवाहनावर प्रशासनाची धाव - Naxalite area abujmad

गडचिरोली जिल्हा प्रशासानातील अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय महसूल अधिकारी मनुज जिंदल, तहसीलदार अनमोल कांबळे यांनी नक्षलवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात बिनागुंडा यागावात जनजागृतीसाठी दौरे केले आणि लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्यापूर्ण केली. यासाठी त्यांना बिनागुंडा गावचा कोतवाल मारोती दुर्वा याचे मोठे सहकार्य लाभले आहे.

corona vaccination drive
corona vaccination drive

By

Published : Jun 3, 2021, 10:39 AM IST

Updated : Jun 3, 2021, 1:29 PM IST

गडचिरोली - बिनागुंडा महाराष्ट्राचे पूर्वेकडील शेवटचे टोक! माडीया जमातीचा अधिवास आणि अतिमागास, अतिदुर्गम व नक्षल प्रभावित असलेल्या या भागाला 'अबुजमाड ' या नावाने संबोधले जाते. नक्षलवाद्यांच्या मते हा भाग ' मुक्त क्षेत्र '(Liberated Zone) मानला जातो. भारत सरकारने या भागाला असुरक्षित क्षेत्र मानले आहे. या परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजन राबवणे आणि लसीकरण करणे एक प्रकारचे आव्हानच होते. मात्र प्रशासनाने जोखीम पत्करत कोरोनाचा प्रसार, त्यासंबंधित प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि लसीकरण याबाबत जनजागृती करत हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

वाडीत जाण्याचा मार्ग दाखवताना आदिवासी महिला

अबुजमाड या नक्षल प्रभावित क्षेत्रातील बिनागुंडाच्या ग्रामस्थांमध्ये कोविड-१९ लसीकरणाबद्दल अफवा पसरलेल्या होत्या. या पसरलेल्या अफवा आणि गैरसमज दूर करून नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करणे ते नक्षलप्रभावी भागात हे एक मोठे जोखमीचे आवाहन होते. मात्र गडचिरोली जिल्हा प्रशासानातील अप्पर जिल्हाधिकारी तथा उप विभागीय महसूल अधिकारी मनुज जिंदल, तहसीलदार अनमोल कांबळे यांनी नक्षलवाद्यांच्या या बालेकिल्ल्यात बिनागुंडा यागावात जनजागृतीसाठी दौरे केले आणि लसीकरणाची मोहीम यशस्वीरित्यापूर्ण केली. यासाठी त्यांना बिनागुंडा गावचा कोतवाल मारोती दुर्वा याचे मोठे सहकार्य लाभले आहे.

नक्षलग्रस्त बिनागुंडात कोविड-19 लसीकरण यशस्वी

लसीकरणाबाबत गाव उदासीन; कोतवालास तिसऱ्या लाटेची भीती-

या बिनागुंडा गावच्या कोरोना लसीकरणाबाबतची सविस्तर माहिती अशी की, बिनागुंडाचे पाटील रामा दुर्वा यांचा तरुण मुलगा मारोती दुर्वा हा या गावात कोतवाल म्हणून काम करत आहे. ज्याप्रमाणे देशात आणि राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. तसा प्रादुर्भाव गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यातही आहे. मात्र, भामरागड तालुक्यात असलेल्या आणि नक्षली कारवायांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या बिनागुंडा परिसरात कोरोना आणि कोरोना लसीकरणाबाबत ग्रामस्थांमध्ये अनेक संभ्रम होते. गावातील लोक कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यासाठी उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. मात्र कोरोनाचा धोका ओळखून असलेला कोतवाल मारोती दुर्वाला समोर असलेल्या संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती होती. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी मारोती दुर्वाने कोणत्याही परिस्थितीत ग्रामस्थांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

अबुजमाड भागातील ग्रामस्थामधील लसीकरणाची सांगुनही उदासीनता दिसून येत आहे. मात्र, त्यांच्यामध्ये जनजागृती करून लसीकरण करवून घेण्यासाठी प्रशासनाची मदत घेण्यासाठी कोतवाल मारोती दुर्वा १८ कि.मी. डोंगर आणि वनझाडीचा परिसर पार करुन लाहेरी आणि भामरागड तहसील कार्यालय गाठले. या ठिकाणी तहसीलदार अनमोल कांबळे यांना गावातील कोरोना आणि लसीकरणाबाबतची परिस्थितीची माहिती दिली. गावकऱ्यांना लसीकरणाचे महत्व पटवून द्यावे त्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घ्यावी अशी विनंती कोतवाल मारोती यांनी तहसीलदार आणि आरोग्य विभागाकडे केली. यापूर्वी देखील आरोग्य कर्मचारी गावात येऊन देखील गावकऱ्यांनी लस घेण्याबाबत उदासीनता दाखवली. मात्र पावसाळा तोंडावर आला आहे, पावसाळ्यात गावाचा संपर्क तुटतो, अशा परिस्थितीत गावात कोरोनाची तिसरी लाट आल्यास गाव उद्ध्वस्त होईल, अशी भीतीही त्याने कांबळे यांच्याकडे व्यक्क करून दाखवली.

चार कॅम्प सुरू करून जनजागृती-

स्वत: कोरोनाची लस घेऊन गावच्या भल्यासाठी जनजागृती करणाऱ्या मारोतीची तळमळ प्रशासनाला जाग आणणारी ठरली. त्यानंतर २६ मे ला भामरागडच्या तहसीलदारांनी उपविभागीय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याशी याबाबत चर्चा करून लसीकरणाच्या मोहिमेची योजना आखण्यात आली. योजनेनुसार कोरोनाविषयक जनजागृतीचे ४ कॅम्प सुरू करण्यात आले. त्यामध्ये १)कुव्वाकोडी (महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील ग्रामपंचायत) २)पेरमिलभट्टी ३)फोदेवाडा ४) बिनागुंडा या ग्रामपंचायतीच्या परिसराचा समावेळ करण्यात आला. ज्या प्रकारे निवडणुकीवेळी बुथ उघडून मतदान प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानुसार या चार कॅम्पच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीत हाती घेण्यात आली यासाठी तीन टप्पे करण्यात आले.

माडीया भाषेतून जनजागृती-

प्रशासकीय पथक ज्यामध्ये उपविभागीय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनुज जिंदल, तहसीलदार अनमोल कांबळे, तलाठी, कोतवाल व काही प्रतिष्ठित व्यक्ती गावागावात जाऊन ग्रामस्थांना एकत्र करत बैठका घेतल्या. सुरुवातील तेथील स्थानिक समस्या जाणून घेतल्या गेल्या आणि त्यानंतर आरोग्याचे महत्व पटवून देत कोरोना लसीकरणाकडे ग्रामस्थामध्ये जनजागृती करण्यात आली. यासाठी फांदेवाडा या तीस घरांच्या गावापासून सुरुवात करण्यात आली. तहसील कांबळे यांनी कोरोनाची जनजागृती करण्यासाठी नियोजन पूर्वक माडीया भाषेतून कोरोना लसीचे महत्व पटवून देण्याचे निश्चित केले. त्यासाठी त्यांनी स्थानिक पुढारी व समाजसेवक यांचे व्हिडिओ ग्रामस्थांना दाखवले. यात समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे यांचा व्हिडिओचाही समावेश करण्यात आला. हे सर्व माडीया भाषेतून कोरोनाचा धोका आणि लसीकरणाचे महत्व याबाबतची माहिती देत होते.

कोविड लसीकरणासाठी घेतलेली ही सभा आता अधिकाऱ्यांना गावातील साध्या समस्यापर्यंत पोहोचवत होती. गावकऱ्यांचे काही प्रश्न होते, ते अधिकाऱ्यांनी जाणून घेतले. त्याचवेळी एका ज्येष्ठ आदिवासी महिलेने कोरोना लसीकरणासोबत गावातील पाण्याची समस्यापण दूर करावी, असे सुचविले. त्यावर प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर आदिवासी गावकऱ्यांनी लसीकरणालाही परवानगी दर्शवली.

८७ टक्के लसीकरण यशस्वी-

बिनागुंडा गावकऱ्यांनी लसीकरणाला तयारी दर्शवता प्रशानसाने गतीने आरोग्य कर्मचाऱ्याचे पथक या परिसरात कोरोना लसीसह पाचारण केले. चार केंद्रावर आरोग्य पथक कोविड-१९ प्रतिबंधक लस घेऊन दाखल झाले आणि गावातील बुथवर ४५ वयापेक्षा पुढील सर्व नागरिकांची यादी काढून त्यांना कोरोनाची लस देण्यात आली, यातील काही अतिवयस्क लोक लस घेण्यास संकोच करीत होते. यावेळी एकूण ६८ पैकी ५९ लोकांनी कोरोनाची लस घेतली. म्हणजे ८७ टक्के लसीकरण झाले. आता प्रशासनाकडून १८ वर्षांवरील सर्वांनाच लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीचा पाठपुरावाही प्रशासानाकडून सुरू करण्यात आला आहे.

Last Updated : Jun 3, 2021, 1:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details