गडचिरोली - राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस समोरा-समोर उभे ठाकले आहेत. राज्यातील हा एकमेव मतदारसंघ असण्याची शक्यता असून काँग्रेसचे उमेदवार म्हणून माजी आमदार दीपक आत्राम यांनी गुरुवारी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले धर्मरावबाबा आत्राम ४ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादीच्या कोट्यातील जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचे शक्तिप्रदर्शन करत नामांकन दाखल - Politics of Maharashtra News
अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर काँग्रेसने आपला उमेदवार उभाकेला आहे. त्यांनी माजी आमदार दिपक आत्राम यांना उमेदवारी दिली आहे.
राज्यातील राजकारणात आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरे जाणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील तणाव गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात बघायला मिळणार आहे. या भागातील माजी अपक्ष आमदार दीपक आत्राम यांना काँग्रेसने उमेदवारी देऊ केली आहे. विशेष म्हणजे आघाडीच्या मतदारसंघ विभागणीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे. मात्र, तरीही काँग्रेसने उमेदवार उभा केल्याने आघाडीत बिघाडीचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
अपक्ष आमदार रूपात 2009 ते 2014 या काळात दीपक आत्राम यांनी विकास कामे खेचून आणली होती. यासह त्यांची आदिवासी विद्यार्थी संघटना चळवळ नामक स्वतंत्र ओळख असून त्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध समस्या शासनदरबारी मांडण्याचे प्रभावी काम त्यांनी चालविले होते. आता काँग्रेसने त्यांना उमेदवारी देऊ केल्याने या मतदारसंघात भाजपसह तिरंगी लढत अपेक्षित आहे. आपली राजकीय शक्ती कित्येक पटींनी वाढली असून आपण निवडणूक जिंकू असा विश्वास दीपक आत्राम यांनी अर्ज सादर केल्यानंतर व्यक्त केला.