गडचिरोली - तेलंगणा सरकारने गोदावरीवर बांधलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याने गडचिरोलीतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कोणतीही सूचना न देता तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतल्याने सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी, उभ्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे.
तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी
कोणतीही सूचना न देता तेलंगणा सरकारने राज्याच्या सीमेवरील मेडीगड्डा धरणाचे दरवाजे बंद केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतीला मोठा फटका बसला आहे. यामध्ये सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.
सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडीगड्डा प्रकल्प उभारला. गतवर्षी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. आता हा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला आहे. प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता तेलंगणाच्या सिंचन विभागाने पाणी अडवले. त्या दबावाने गोदावरीचे पाणी सिरोंचा तालुक्यातील दहा गावांमधील शेतात शिरले आहे. यामुळे कापूस, मिरचीसह रब्बी हंगामातील शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. मेडीगड्डा धरणाला एकूण 85 वक्राकार दारे आहेत. हैदराबादला पाणी पोहोचवण्यासाठी प्रमुख चार टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. प्रकल्पाच्या 13 हजार 74 हेक्टर एकूण बुडीत क्षेत्रापैकी 1227 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे.
मेडिगड्डा धरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 562 एकर जमीन संपादित करण्यात आली. तेलंगणा सरकारने सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी जमीन धारकांना मोठा मोबदला दिला. मात्र, सिरोंचा तालुक्यातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला न देता हे पाणी आडवल्याने तीव्र रोष पसरला आहे.