गडचिरोली -राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने वीक-एंड लाकडाऊन घोषित केले आहे. गडचिरोली जिल्हाधिकारी यांनीही वीक-एंड लॉकडाऊन नियमावली जाहीर केल्याने आज शुक्रवारी गडचिरोली शहरातील अत्यावश्यक सेवेची दुकान वगळता सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णता बंद आहेत. त्यामुळे एरवी गजबजलेले दिसणारे रस्ते आज शांत दिसले.
रोज आढळत आहेत दीडशे-दोनशे रुग्ण
गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 12 हजारांवर गेला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून दीडशेहून अधिक कोरोनाबाधित आढळत असून गुरुवारी तब्बल 219 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. राज्यात हीच स्थिती असल्याने राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले आहेत. त्याचा परिणाम म्हणून वीक-एंड लॉकडाऊन घोषित करण्यात आले असून गडचिरोली शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने आजपासून दोन-तीन दिवस पूर्ण बंद राहणार आहेत. शाळा महाविद्यालय यापूर्वीच बंद करण्यात आले असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक रस्त्यावर
राज्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने जिल्हाधिकारी दीपक सिंगला आणि पोलीस अधीक्षक अंकित गोयल स्वतः रस्त्यावर उतरून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. गुरुवारी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक मुख्य रस्त्यावर उतरून अनेक हॉटेल व्यवसायिकांना केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवावी, असे आदेश देत होते. तर गडचिरोली बसस्थानकाला भेट देऊन कोणताही प्रवासी उभा राहून प्रवास करणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आगार व्यवस्थापकांना निर्देश दिले.