गडचिरोली- कोरोनाच्या संकटाने लांबलेल्या जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीच्या निवडणुका अखेर दोन टप्प्यात होणार आहेत. त्यापूर्वी नामांकन भरण्यासाठी उमेदवारांच्या तहसील कार्यालयामध्ये रांगा दिसून येत आहेत. जिल्ह्यातील 5 लाख 42 हजार मतदार हे 3089 ग्रामपंचायत सदस्य निवडणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील 361 ग्रामपंचायतीसाठी पहिल्या टप्प्यात 15 जानेवारीला तर दुसऱ्या टप्प्यात 20 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 22 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
अर्ज खरेदीकरता उमेदवारांनी लावल्या रांगा दोन टप्प्यात होणार होणार मतदान-गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली व धानोरा या तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 20 जानेवारी मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यासाठी सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. दोन्ही टप्प्याची मतमोजणी 22 जानेवारीला होणार आहे.
हेही वाचा-ग्रामपंचायत रणधुमाळी : ५५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची तयारी
तीन हजार मतदार पहिल्यांदाच करणार मतदान-
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळेस 3 हजार 800 नवीन मतदार वाढले आहेत. त्यापैकी तीन हजार मतदार ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एप्रिल ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 361 ग्रामपंचायतीसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 5 लाख 42 हजार 37 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातच काही ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. मात्र, कोरोना संकट वाढत गेल्यानंतर ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यादरम्यान आणखी काही ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने निवडणूक होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीची संख्या वाढली आहे.
हेही वाचा-ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मनसे पूर्ण तयारीत, शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न
मुद्रांक खरेदीसाठी गर्दी-
नामांकन दाखल करताना उमेदवाराला शपथपत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात मुद्रांक खरेदीसाठी उमेदवारांच्या रांगा दिसून येत आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी 24 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र, निवडणूक जाहीर होऊनही सरपंचपदाचे आरक्षण निघाल्याने निवडणुकीतील उत्साह फारसा दिसून येत नाही.
सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष-
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची जाहीर केली असली तरी सरपंच पदाचे आरक्षण सोडत अद्याप निघालेली नाही. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. निवडून येऊनही आरक्षण न निघाल्यास सरपंच पदापासून मुकावे लागणार, अशी खंत अनेक जण व्यक्त करीत आहेत. आरक्षण निघाले असल्यास सरपंच पदासाठी दावेदार म्हणून अनेकजण पॅनल लढवून सरपंच पदावर आरूढ होत असतात. मात्र, अद्यापही सरपंच पदाचे आरक्षण न निघाल्याने अनेकांमध्ये निरुत्साह दिसून येत आहे.