महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 4, 2020, 1:52 PM IST

ETV Bharat / state

भाजपाच्या नगरसेवकांची स्वतःच्याच नगराध्यक्षाविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

जिल्ह्यातील नगरपालिका राजकारणात राजकीय भूकंप बघायला मिळत आहे. भाजपाच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे.

गडचिरोली
गडचिरोली

गडचिरोली - जिल्ह्यातील नगरपालिका राजकारणात राजकीय भूकंप बघायला मिळत आहे. या नगरपालिकेत भाजपाला बहुमत आहे. तर भाजपाच्या योगिता पिपरे थेट निवडल्या गेल्या आहेत. मात्र, नियमबाह्य पद्धतीने ठराव मंजूर करून घेत असल्याचे कारण देत भाजपाचे नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे नगराध्यक्षांविरोधात तक्रार केली आहे. याचाच फायदा उचलत काँग्रेस नगरसेवकांनी देखील आता प्रकरण उचलून धरले आहे.

सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी फडणवीस सरकार असताना राज्यातील बहुतांश नगरपालिका व महानगरपालिकामध्ये भाजपाने घवघवीत यश संपादन केले होते. त्यात गडचिरोली नगरपालिकेचा ही समावेश होता. थेट नगराध्यक्ष निवड पद्धतीने भाजपाच्या योगिता पिपरे निवडल्या गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर भाजपाच्या अंतर्गत गोटात नगराध्यक्ष पिपरे यांच्या विरोधात असंतोष वाढीस लागला आहे. त्याचा परिणाम आता पाहायला मिळत आहे.

गेली दीड वर्षे योगिता पिपरे यांनी वाहन वापरण्यासाठी निधीला कार्योत्तर मंजुरी दिल्याचे प्रकरण पुढे आले आहे. नियमबाह्य पद्धतीने हा सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च मंजूर करवून घेतल्याचा भाजपा नगरसेवकांचा आरोप आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहिता काळात वाहन वापरण्यास मनाई असताना हा निधी उचलला गेला असून, याप्रकरणी आता कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनीच केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीची आतापर्यंत एक सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार आहे.

नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी मात्र, वाहन वापरासाठीचा कार्योत्तर निधीचा प्रस्ताव नगरपालिकेच्या आमसभेत 20 नगरसेवकांच्या होकाराने मंजूर झाल्याचे सांगितले. यासंदर्भातील सर्व शासन आदेश आपण प्रोसिडिंगला जोडले असून कुठल्याही पद्धतीने आपली कृती नियमबाह्य नव्हती, अशी प्रतिक्रिया दिली आहे. गडचिरोली शहरात विकासाची कामे होत असून या कामांना काही नगरसेवक नाहक विरोध करत असल्याचे पिपरे यांनी नमूद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details