गडचिरोली- एकीकडे भारत महासत्तेकडे वाटचाल करत आहे. तर दुसरीकडे अनेक गावांनी आजही साधी बस बघितलेली नाही. एकीकडे शहरामध्ये टोलेजंग इमारती उभ्या आहेत तर भामरागडसारख्या गावांमध्ये अनेकांना राहण्यासाठी पक्का निवारा नाही. त्याचबरोबर, गावात जाण्यासाठी धड रस्ता देखील नाही. आदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने त्यांची शहरांशी नाळ तुटली आहे. मात्र, लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना आधुनिक भारताचे दर्शन घडवले गेले आहे. यावेळी ३५ आदिवासींनी प्रथमच नागपूरच्या 'मेट्रोची राईड' करून आधुनिक भारताची झलक बघितली आहे.
लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसाच्या वतीने दरवर्षी भामरागड तालुक्यातल्या लहान-लहान खेड्यापाड्यातील आदिवासी स्त्री-पुरुषांना तसेच मुलांना बाहेरचे जग दाखविण्याचा उपक्रम आयोजित केला जातो. यावेळेस भामरागड तालुक्यातील कोडपे व तिरकामेटा या दोन अतिदुर्गम गावातील ३५ आदिवासी स्त्री-पुरुषांना नागपूरची सहल घडवण्यात आली. तीन दिवसांच्या या दौऱ्यात त्यानी सर्वप्रथम सोमनाथला भेट दिली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन बघितले आणि गुरुवारी नागपुरात दाखल झाले. यावेळी नागपूरच्या मेट्रोची राईड करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखे होते.