गडचिरोली - अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असलेला अहेरी मतदारसंघ एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. धर्मराव बाबा आत्राम हे अहेरीचे सर्वेसर्वा होते. मात्र, मोदी लाटेत त्यांचा हा बालेकिल्ला भाजपने बळकावला आणि ज्या अहेरीत एकेकाळी भाजपचे बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते होते, तिथे आता अनेकांना भाजप प्रवेशाचे वेध लागले आहे. फक्त वेधच नाही तर झुंबड उडाली आहे.
अतिसंवेदशील असलेल्या या मतदारसंघात यापूर्वी तिरंगी लढती झाल्या. यावेळीही तश्याच लढतीची शक्यता असली तरी भाजपला भाव आहे. कारण, अनेक प्रस्तापित नेत्यांना भाजपमध्ये जायचे आहे.
नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील आणि आदिवासी'... होय अशीच ओळख आहे या मतदारसंघाची. नक्षलग्रस्त आणि राज्याच्या अगदी टोकावर असलेला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ नक्षलग्रस्त असल्यामुळे साहजिकच 'अतिसंवेदनशील' हे बिरूद या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक मतदान केंद्राला चिटकलेलं आहे. अहेरी मतदारसंघात अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा आणि मूलचेरा या तब्बल पाच तालुक्यांचा समावेश होतो. पाचही तालुके अतिसंवेदनशील आहेत. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली निवडणूक कधीच सामान्य नसते. प्रशासन आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या लेखी तर महाराष्ट्रातील सर्वात आव्हानात्मक विधानसभा मतदारसंघात अहेरीचे नाव घेतात.
भाजपचे विद्यमान आमदार आणि माजी राज्यमंत्री राजे अंबरीशराव आत्राम हे गोंड राजघराण्याचे सहावे वंशज. राजे सत्यवानराव आत्राम यांचे ते चिरंजीव. कट्टर विदर्भवादी नेते असलेले सत्यवान आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली. 90 च्या दशकात अपक्ष म्हणून नागविदर्भ आंदोलन समितीच्या बॅनरखाली त्यांनी विधानसभा लढवली. ते सलग दोनवेळा आमदार राहिले. मात्र, ते फार काळ राजकारणात राहू शकले नाही.
राजे सत्यवान यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाल्याने त्यांचा राजकीय वारसा विद्यमान आमदार राजे अंबरीषराव आत्राम यांना मिळाला. 2014 मध्ये अंबरीष आत्राम हे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि त्यांना भाजपतर्फे ऑफर देण्यात आली. त्यांनी ती स्वीकारली आणि मोदी लाटेत ते प्रचंड मतांनी निवडून आले. राज्याच्या विधानसभेत युवा चेहरा, उच्च शिक्षित असल्याने त्यांना भाजपने राज्यमंत्रीपद दिले. त्यांच्याकडे आदिवासी विकास आणि वन मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. तसेच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीही बनवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, नव्यानेच राजकारणात आलेल्या अंबरिषरावांचा राजकीय अनुभव कमी पडला. अनेक महत्त्वाच्या बैठकीत ते गैरहजर राहिले, संपर्कही कमी झाला. स्थानिक संघ परिवारातील लोकांनाही ते वेळ देत नाही, अशा अनेक तक्रारीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात त्याचे मंत्रिपद काढून घेण्यात आले. आता परत त्यांना भाजप तिकीट देईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
दुसरीकडे धर्मरावबाबा आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीत प्रदेश उपाध्यक्ष आहेत. ते 1971-72 पासून राजकारणात सक्रिय असून नागविदर्भ आंदोलन समितीचे खंदे कार्यकर्ते असलेले धर्मराव बाबा आत्राम 1990 ते 95 या काळात काँग्रेसचे आमदार राहिले. 1995 ते 99 या काळात ते गोंडवाना गणतंत्र पक्षाचे आमदार होते. 2004 मध्ये ते राष्ट्रवादीत आले.
आघाडी सरकारमध्ये ते राज्यमंत्रीही होते. मात्र, बारामती भागात काळवीट शिकार प्रकरणात त्यांना मंत्रीपद गमवावं लागलं होत. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार दीपक आत्राम यांनी त्यांना पराभूत केलं. तर, 2014 मध्ये भाजपचे राजे अंबरीशराव यांनी त्यांना 19,858 मतांनी पराभूत केले होते. मात्र, यावेळी चित्र वेगळे असून त्यांनाही विजयाची आशा आहे.