गडचिरोली : येत्या 17 जानेवारीला गडचिरोली जिल्ह्यात 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलिओचा डोस देण्यात येणार आहे. ही लसीकरण मोहीम यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल 89 हजार 710 चिमुरड्यांना पोलीओ डोस दिला जाणार आहे. तसेच, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या लसीकरणावेळी आरोग्य विभागाकडून आवश्यक खबरदारी घेतली जाणार आहे, अशी माहिती मंगळवारी सिंगला यांनी दिली.
2,142 बूथवर लसीकरण..
जिल्ह्यातील 0 ते 5 वयोगटातील अपेक्षित 89 हजार 710 मुलांना पोलीओ डोज दिला जाणार आहे. यामध्ये 8,471 शहरी आणि 81,239 ग्रामीण लाभार्थी असणार आहेत. यासाठी 1 लाख 65 हजार आवश्यक पोलिओ डोस उपलब्ध झाले आहेत. 2,093 ग्रामीण तर 46 शहरी अशा 2,142 लसीकरण बूथवर पोलिओचे डोस दिले जाणार आहे.
सार्वजनिक ठिकाण, दुर्गम ठिकाण यांसाठी विशेष पथके..
बसस्थानक, रेल्वेस्थानक तसेच इतर सार्वजनिक वाहतुकीच्या १३७ ठिकाणी तैनात करण्यात आलेली वैद्यकीय पथके हे लसीकरण करणार आहेत. यासोबतच दुर्गम आदिवासी पाडयांवर लसीकरण करण्यासाठी 95 फिरती पथके असणार आहेत. यापुर्वी 11 मार्च 2018 रोजी जिल्ह्यात 97.80 टक्के, 10 मार्च 2019 रोजी 99.14 टक्के तर 19 जानेवारी 2020 रोजी 97.42 टक्के लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पाडली गेली होती. यावेळी जिल्ह्यातील पोलीओ लसीकरण मोहिम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात 1999 नंतर पोलीओ रुग्ण नाही..
गडचिरोली जिल्ह्यात 21 वर्षापूर्वी पोलिओच्या रुग्णाची शेवटची नोंद झाली आहे. तसेच 2014ला जिल्ह्याला पोलिओ-फ्री जिल्हा म्हणूनही घोषित करण्यात आले होते. परंतु यावर्षी अफगानीस्तानमध्ये 54 तर पाकिस्तानमध्ये 86 पोलिओ रुग्ण आढळून आल्याने, जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ लसीकरण अजूनही पहिल्या इतकेच महत्वाचे असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्याही प्रकारचे मुलांचे लसीकरण हे मुलांमध्ये प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी असते. त्यामुळे मुलांना वेळेत लसीकरण आवश्यक आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.