गडचिरोली- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बँकांनी मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यातील जवळपास २९ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
माहिती देताना गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह डिसेंबर अखेर शासनाकडून कर्जमुक्तीबाबत शासन निर्णय काढल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीबाबत जिल्ह्यात त्या अनुशंगाने कामे सुरू झाली आहेत. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यासाठी जिल्हा व राष्ट्रीयकृत बँका तसेच सेवा सोसायट्या कामाला लागल्या आहेत. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान घेतलेले कर्ज तसेच ३० सप्टेंबर २०१९ रोजी २ लखांपर्यंत थकीत असलेले मुद्दल व व्याज याचा समावेश कर्जमुक्तीमध्ये केला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
बँकांनी जाहीर केलेल्या याद्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकृत करणे गरजेचे
शेतकऱ्यांना त्यासाठी अर्ज करण्याची गरज नाही. ही योजना बँकेने सादर केलेल्या कर्जाच्या रकमेवर व आधारशी जोडलेल्या आकडेवारीवर आधारीत राबविली जाणार आहे. बँकांनी जाहीर केलेल्या पात्र याद्या तहसीलदार, बीडीओ, बँक शाखा कार्यालयांवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. बँकांनी जाहीर केलेल्या याद्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकृत करण्याची गरज आहे. यासाठी एसएमएस देखील शेतकऱ्यांना पाठविला जाईल. आपले सरकार सेवा केंद्राला भेट दिल्यानंतर आकडेवारीचे प्रमाणीकरण शेतकऱ्यांनी त्यांच्या हितासाठी केले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी आपले तपशील बरोबर दिले नाहीत त्यांना आपली तक्रार ऑनलाईन करता येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
योजनेच्या अंमलबजावणीकरीता बँकांनी पात्र व आधार कार्ड संलग्न न केलेल्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी पुढील आठवडाभरात संलग्न करावे. तसेच आधार क्रमांक संलग्न केला नसल्यास शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेल्या बँकेकडे आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स व मोबाईल क्रमांक सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
हेही वाचा-अखेर काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांना अटक