गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील ७० ते ८० शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन केले जाणार आहे. मराठी शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. असे असले तरीही जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील मराठी शाळा ओस पडताना दिसत आहेत.
गडचिरोलीत जिल्हा परिषदेच्या ७० ते ८० शाळा बंद करण्याच्या हालचाली १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला आहे. तरीही जिल्ह्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा सुरू आहेत. परंतु तेथील शिक्षकांच्या पगाराचा खर्च आणि विद्यार्थ्यांची रोडावलेली संख्या लक्षात घेता, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे इतरत्र समायोजन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात कमी पटसंख्या असलेल्या जवळपास ७२ प्राथमिक शाळा आहेत. त्यामुळे बंद झालेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन गावालगतच्या पाच किलोमीटर अंतरावरील उच्च प्राथमिक शाळेत केले जाणार आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी असा निर्णय घेतला होता. मात्र, शिक्षक संघटनांच्या विनंतीनंतर ही प्रक्रिया थांबली होती.
हेही वाचा -गोंडवाना विद्यापीठ : शेतपिकाच्या नुकसानीमुळे विद्यार्थ्यांचे उन्हाळी परीक्षा शुल्क माफ
'गाव तेथे शाळा' असा संकल्प करून शिक्षण विभागाने गावागावांत प्राथमिक शाळा सुरू केल्या. मात्र, गेल्या काही वर्षांत शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच नामांकित शाळांमध्ये विद्यार्थी पाठवण्याची प्रक्रिया राबविण्यात आल्याने ग्रामीण भागात जिल्हा परिषदेतील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या रोडावली आहे. कित्येक शाळांमध्ये पहिली ते चौथीपर्यंत २० पेक्षा कमी पटसंख्या आहे. जिल्ह्यातील भामरागड, अहेरी, कोरची, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, धानोरा आणि कुरखेडा या तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम आहेत. कित्येक गावांमध्ये जाण्यासाठी आजही पक्के रस्ते नाहीत. त्यामुळे शिक्षणासोबतच अन्य सोयी सुविधाही लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत.
हेही वाचा -गडचिरोलीत जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षिकांचे निलंबन
पावसाळ्याच्या दिवसांत तर आठ-आठ दिवस शाळा बंद असतात. २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये शिक्षकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या वेतनापोटी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. एक ते चार वर्गासाठी दोन शिक्षक असून आठवडाभर एका शिक्षकाने शिकवायचे आणि दुसऱ्या शिक्षकाने दांडी मारायची, असा प्रकार सर्रासपणे सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारी पंचायत समिती स्तरावर पोहोचल्या आहेत. ही समस्या ओळखून शिक्षण विभागाने आता कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राघवेंद्र मुनघाटे यांनी दिली.