गडचिरोली - गेल्या काही दिवसांमधे गडचिरोली तालुक्यातील काही गावांमध्ये नागरिक वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले आहेत. याबाबत वनविभागाला संबंधित वाघाला शोधून त्याचा बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सद्या वाघ मिळाला नसल्या कारणाने त्याला पकडण्यासाठी अजून 10 दिवसांची मुदत वन विभागाला देण्यात आली आहे.
नागरिकांनी एकटे जंगलात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गुराख्यांनी एकत्रित चार पाच जण मिळूनच जंगलात जावे. तसेच घनदाट जंगलात न जाता गावा जवळ गुरे चारावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच मागील 15 दिवसांमध्ये काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत उपविभागीय अधिकारी गडचिरोली व वडसा यांना याबाबत क्षेत्रीय भेट देवून तपासणीच्या सूचनाही जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिल्या आहेत.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी गावांगावात दवंडी द्वारे, पोलीस पाटील, ग्रामपंचायत यांचेद्वारे नागरिकांना माहिती देण्याच्या सूचना केल्या. वनविभागाने वाघाच्या शोधासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत, पथके वाघाला पकडण्यासाठी नेमली आहेत. शुटरची मदत यासाठी घेतली जात आहे.