गडचिरोली -छत्तीसगड राज्यामध्ये कोरोना लस नक्षलवाद्यांकडून पळवली जाऊ शकते, असा इशारा गुप्तचर यंत्रणांनी राज्य सरकारला दिला. या इशाऱ्यानंतर छत्तीसगढ राज्य सरकार अलर्ट झाले आहे. गडचिरोली जिल्हाही नक्षलवादी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, जिल्ह्यात दाखल झालेली 12 हजार कोरोना डोस लस सुरक्षित आहे. गुप्तचर यंत्रणांबाबत कुठलाही भाष्य करण्यात करता येणार, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
जिल्ह्यात दाखल झाले 12 हजार डोस -महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्हयात कोरोना लसीचे 12 हजार डोस 14 जानेवारीला गुरुवारी सकाळी 9 वाजता पोहोचले. गेले वर्ष कोरोना संसर्गामुळे जगभर या लसीची प्रतिक्षा होती. राज्यासह देशात 16 जानेवारीला पहिल्या टप्याालत कोरोना लसीकरणाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमिवर गुरुवारी जिल्हयात 6 हजार कर्मचाऱ्यांना दोन्ही डोससाठी 12 हजार डोजचा साठा उपलब्ध झाला आहे. यानंतर उर्वरीत कर्मचाऱ्यांसाठी पुढिल आठवडयात साठा उपलब्ध होणार आहे. आज आलेल्या 12 हजार कोरोना लस आवश्यक तापमानात ठेवण्यात आल्या आहेत.