ईटीव्ही भारत विशेष : कोरोना संकटातही कुपोषणमुक्तीसाठी अंगणवाडी सेविकांचा लढा - गडचिरोली कोरोना अपडेट
बालकांच्या शारीरिक वाढीची नोंद घेण्यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्यातील 2 हजार 287 अंगणवाडी केंद्रांना सॉल्टर स्केल, इलेक्ट्रॉनिक वजन काटे उपलब्ध करून दिले. त्यापैकी 902 वजन काटे सद्यस्थितीत बंद आहेत. जुलै 2020 च्या अहवालानुसार उंची व वजनाच्या आधारावर जिल्ह्यात 741 तीव्र कुपोषित तर 2 हजार 191 मध्यम कुपोषित बालके आढळून आली. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गडचिरोली -कोरोना महामारीमुळे अख्खे जग संकटात सापडले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून अंगणवाडी केंद्र तसेच शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, अंगणवाडी सेविका कोरोना संकटातही कुपोषणमुक्तीची धुरा अविरतपणे हाकताना दिसत आहेत. कुपोषण मुक्तीसाठी बालकांना सकस आहार पुरविणे तसेच त्यांच्या शारीरिक वाढीची नोंद घेणे, गर्भवती महिलांना मार्गदर्शन करणे ही नियमित कर्तव्ये पार पाडतानाच कोरोना मुक्तीसाठी गाव सर्व्हे करणे, अशी अतिरिक्त कामे करावी लागत असल्याने अंगणवाडी सेविकांवरचा ताण वाढला आहे.
जिल्ह्यात 1 हजार 771 अंगणवाडी केंद्र तसेच 516 मिनी अंगणवाडी केंद्र अशा 2 हजार 287 अंगणवाडी केंद्रांनी कुपोषणमुक्तीसाठी 78 हजार 589 बालकांना समाविष्ट केले आहे. तर जुलै महिन्याच्या अहवालानुसार 7 हजार 510 गरोदर माता व 5 हजार 301 स्तनदा मातांना लाभार्थी म्हणून समाविष्ट केले आहे. या सर्व बालक व मातांना दर महिन्याला पोषण आहार पुरवण्याचे तसेच त्यांच्या शारीरिक वाढीची नोंद घेण्याची कामे अंगणवाडी सेविका नियमितपणे करीत आहेत. मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले तेव्हापासून अंगणवाडी केंद्र कायमचे बंद आहेत. मात्र, अंगणवाडी केंद्रात समाविष्ट बालकांना राज्य शासनाकडून पुरवठा होत असलेला सकस पोषण आहार बालकाच्या घरी पोहोचवण्याचे काम अंगणवाडी सेविकाकडून सुरू आहे. तसेच त्यांच्या शारीरिक वाढीची नोंद घेण्यासाठी प्रत्येक महिन्याला चार ते पाच विद्यार्थ्याला अंगणवाडी केंद्रात बोलावून त्याचे वजन व उंचीची नोंद घेणे सुरू आहे.