गडचिरोली : मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडवण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी मुख्य मार्गावर भूसुरुंग स्फोट पेरून ठेवले होते. मात्र नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. चामोर्शी तालुक्यातील रेगडी-कोटमी मार्गावर सुमारे १० किलो वजनाचा भूसुरुंग स्फोट गडचिरोली पोलिसांकडून निकामी करण्यात आला.
नक्षल नेता चारू मुजुमदारच्या स्मृतीप्रित्यर्थ 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल सप्ताह पाळण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आधीपासूनच जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. आज सुरक्षा दलाला टार्गेट करण्यासाठी रेगडी ते कोटमी मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरूंग लावून ठेवला होता. याच मार्गावर पोलीस मदत केंद्र रेगडीचे जवान रोड सर्चिंग करत असताना नक्षलवाद्यांनी घातपाताच्या दृष्टीने भूसुरुंग लावल्याचे निदर्शनास आले.