गडचिरोली - स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही मायबाप सरकार लक्ष देत नसल्याने निरक्षर आदिवासींनीच पुढाकार घेतला आणि भन्नाट कल्पनेतून नाल्यावर सुंदर असा लाकडी पूल तयार केला आहे. या पुलामुळे छत्तीसगडच्या सीमेवरील अबुजमाड पहाडी परिसरातील चार गावातील नागरिकांची वाहतूक आता सुलभ झाली आहे. 'नो इंजिनियर, नो इस्टिमेट' म्हणत श्रमदानातून बांधण्यात आलेल्या देखण्या पुलामुळे आदिवासी नागरिकांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
भन्नाट कल्पनेतून आदिवासींनी बांधला लाकडाचा पूल अबुजमाड पहाडावर जाण्यासाठी रस्ता-
महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील अबुजमाड जंगल परिसर आहे. या अबुजमाड पहाडावर जाण्यासाठी रस्ता नाही. पायवाटेने नागरिकांना ये-जा करावी लागते. या वाटेत अनेक छोटे नाले, गुंडेनुर, बीनागुंडा, तुर्रेमरका, कुव्वाकोडी, पोदेवाडा इत्यादी गावातील नागरिकांना दरवर्षी नाल्याच्या पाण्यातूनच वाट काढावी लागत होती. वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही मायबाप सरकार लक्ष देत नसल्याने परिसरातील आदिवासी नागरिकांनीच पुढाकार घेतला. मग काय, बघता बघता नाल्यावर सुंदर असा तयार झाला.
60 मीटरचा पूल -
मागील 6 वर्षापासून गुंडेनुर गावातील नागरिक बांबू पासुन ताटवे बनवून पुल तयार करायचे. पण यावर्षी नवीन प्रयोग करत लाकूड पाट्याचे पुल बनविले आहे. हा पुल बांबूच्या पुलापेक्षा मजबूत आहे. त्याची लांबी जवळपास 60 मीटर आहे. गावातील नागरिक एकत्र येवून असाध्य कामही पूर्ण करू शकतात, हा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. या नाल्यावर पुल नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. हा पूल असता तर कदाचित तिचे प्राण वाचले असते. येथे पुल बांधकाम झाले तर थेट बिणागुंडा परिसर जोडला जाईल. या मार्गावरचा हा एकमेव मोठा नाला आहे.
पाच गोलाकार पिल्लरवर पूल-
पुल बांधकामासाठी जंगलातील लाकूड पाट्या आणि झाडाच्या सालीपासून बनविलेली दोरी आणि आपल्या बुध्दीचा वापर करण्यात आला. बांबू पासुन बनविलेले पाच पिल्लर गोलाकार केले. त्यात नदीतील मोठे दगड आणि रेती भरली. त्यामुळे हा पिल्लर मजबूत झाला. अशा प्रकारचे पाच पिल्लर पाण्यात उभे केले. या नाल्यात आता पाणी वाहत असल्यामुळे खुप अडचण निर्माण झाली. परंतू गावकऱ्यांनी जिद्द सोडली नाही. अखेर हा पुल तयार झाला. साधारण पाण्यात वाहून जाणार नाही असा हा पुल तयार झाला असून पुलावरून दुचाकीही सहज जाऊ शकते.