महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओडिशातून भटकलेल्या हत्तींचे कळप गडचिरोलीत, हल्ल्यात एक शेतकरी जखमी - etv bharat live

भटकलेल्या रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात दाखल झाले आहेत. हे हत्ती ओडिशातून आले आहेत. यामध्ये परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एका हत्तीने केलेल्या हल्ल्यात धानोरा तालुक्यातील कन्हारटोला येथील अशोक मडावी हे शेतकरी जखमी झाले आहेत.

ओडिशातून भटकलेल्या हत्तींचे कळप गडचिरोलीत, हल्ल्यात एक शेतकरी जखमी
ओडिशातून भटकलेल्या हत्तींचे कळप गडचिरोलीत, हल्ल्यात एक शेतकरी जखमी

By

Published : Oct 22, 2021, 7:21 AM IST

गडचिरोली - ओडिशातून भटकलेल्या रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात दाखल झाले आहेत. यामध्ये परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातील एका हत्तीने केलेल्या हल्ल्यात धानोरा तालुक्यातील कन्हारटोला येथील अशोक मडावी हे शेतकरी जखमी झाले आहेत.

ओडिशातून भटकलेल्या हत्तींचे कळप गडचिरोलीत

वनविभागाने या नुकसानीचे पंचनामेही केले

ओडिशा राज्यातील हत्तीचे भटकलेले कळप सध्या गडचिरोली जिल्ह्याच्या कोरची व धानोरा तालुक्यात घुसले आहेत. कोरची तालुक्यातील टिपागड परिसर, कोटगूल व रानकट्टा भागातील जंगलात या हत्तींचा समूह फिरत होता. ४ व १५ ऑक्टोबरला या हत्तींचा कळप आला आहे. दरम्यान, यामध्ये रानकट्टा येथील धरमसिंग कुरचामी. लालसाय नेताम, निरंगू कोरचा, मन्साराम पुड़ो, नरसू कोरचा. सनकू गोटा, राजेश नैताम, पुनराम पदा. शेरकू कोरचा व अमरसिंग तुलावी या शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. त्यानंतर वनविभागाने या नुकसानीचे पंचनामेही केले आहेत.

हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष

हा हत्तीचा समुह कुरखेडा तालुक्यातील मालेवाडामार्गे धानोरा तालुक्यातील येरकड, जपतलाई, कन्हारटोला इत्यादी गावांशेजारच्या जंगलात आला. हे हत्ती शेतीची नासधूस करीत आहेत. काल रात्री कन्हारटोला येथील एका शेतात हत्ती घुसले. यावेळी शेतमालक अशोक मडावी याने हत्तीला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तीनेच त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. त्याला नागपूरला हलविण्यात आले असून, वनविभाग त्याच्या उपचाराचा खर्च करणार असल्याचे गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी सांगितले. या हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

जंगली प्राण्यांवर आपण हल्ला केला ते आक्रमक होऊन बचावासाठी मनुष्यावर हल्ला करतात

हत्तींनी मनुष्यावर हल्ले केल्याचे वन विभागाच्या पाहणीत आढळून आले नाही. मात्र, जेव्हा कोणत्याही जंगली प्राण्यांवर आपण हल्ला केला अथवा त्यांच्या वातावरणात व्यत्यय आणला, तर ते आक्रमक होऊन बचावासाठी मनुष्यावर हल्ला करतात. शिवाय मोठा आवाज केल्याने अथवा फटाके फोडल्यानेही ते मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी हत्तींना हुसकावून लावण्यासाठी त्यांच्या कळपामागे धावू नये. हत्तीला पाहण्यासाठी, फोटो काढण्यासाठी तिकडे जाऊ नये, असे आवाहन डॉ. मानकर यांनी केले आहे.

नुकसान झाल्यास वन विभागाकडून पंचनामे

हर्तीच्या कळपामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. अशा ठिकाणी वन विभागाने पंचनामे केले आहेत. तसेच, इतर ठिकाणी पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी आपल्या शेतातील झालेल्या नुकसानीची माहिती वन विभागाचे कर्मचारी. तलाठी, ग्रामसेवक यांना द्यावी. त्यानंतर शेताचे पंचनामे करून संबंधितास नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया राबविली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक डॉ. मानकर यांनी सांगितले.

हेही वाचा -एनसीबी अधिकारी समीर वानखेडे दुबईला गेले होते, नवाब मलिक यांचा दावा

ABOUT THE AUTHOR

...view details