महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फ्रिजवाल गायी वाटप घोटाळ्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हे दाखल ; 53 गायी जप्त

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लाभार्थी पशुपालकांना फ्रिजवाल प्रजातीच्या गायी वाटप करावयाच्या होत्या. हे काम प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना कंपनी लिमिटेडकडे देण्यात आले होते. परंतु, कंपनीने ऑक्टोबर 2019 मध्ये पात्र लाभार्थींना गायी न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावली होती. या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

  फ्रिजवाल गाई घोटाळा
फ्रिजवाल गाई घोटाळा

By

Published : Jul 4, 2020, 9:45 AM IST

गडचिरोली - आरमोरी तालुक्यातील बहुचर्चित फ्रिजवाल गायी वाटप घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच 53 फ्रिजवाल गायी जप्त करुन त्या पशुसंवर्धन विभागाकडे सुपूर्द केल्या आहेत.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लाभार्थी पशुपालकांना फ्रिजवाल प्रजातीच्या गायी वाटप करावयाच्या होत्या. हे काम प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना कंपनी लिमिटेडकडे देण्यात आले होते. परंतु, कंपनीने ऑक्टोबर 2019 मध्ये पात्र लाभार्थींना गायी न देता त्यांची परस्पर विल्हेवाट लावली होती. यासंदर्भात वासुदेव वंजारी यांनी 6 जानेवारी 2019 ला केलेल्या तक्रारीवरुन आरमोरी पोलिसांनी ५ जणांवर भादंवि कलम 406, 465, 468, 471, 420, 120 (ब) अन्वये गुन्हे दाखल केले होते.

आरोपी घनश्याम वासुदेव तिजारे यास 7 जानेवारीला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तो जामीनावर सुटला होता. दोन दिवसांपूर्वी श्याम श्रीहरी पराते, अरविंद श्रीहरी पराते व प्रकाश केशव तिजारे यांना अटक करण्यात आली. तर नरेश घनश्याम तिजारे हा फरार आहे.

या कारवाईनंतर आज शुक्रवारी आरमोरीचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्यासह आरमोरी तालुक्यातील आरमोरी, अतरंजी, डोंगरगाव, पळसगाव, शिवणी, करपडा व देसाईगंज तालुक्यातील कुरुड आणि कोंढाळा येथे छापे टाकून ५३ फ्रिजवाल गायी जप्त केल्या. त्यानंतर या गायी पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सुपूर्द करण्यात आल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details