गडचिरोली - गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 46.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पिकाला जीवदान मिळाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात २४ तासात 46.6 मिलिमीटर पाऊस, भात पिकाला जीवदान - गडचिरोली जिल्ह्यात दमदार पाऊस
गडचिरोली जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे भात पिकाला पुन्हा जीवदान मिळाले आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे पिक वाळण्याच्या स्थितीत आले होते. मात्र गेल्या 24 तासात जिल्ह्यात 46.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे करपण्याच्या मार्गावर असलेल्या धान पिकाला जीवदान मिळाले आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे रोवणी योग्य झालेले धान परे करपण्याच्या मार्गावर होते. काही शेतकऱ्यांनी ऑईल इंजिन, मोटर पंपाद्वारे पिकांना पाणी देऊन रोवणीची कामे आटोपली. मात्र ज्या शेतकऱ्यांना पाण्याचे साधन नाही, त्यांची रोवणीची कामे खोळंबली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची सतत रिपरिप सुरू आहे. पावसाचा जोर वाढत नसला तरी दोन दिवसांपासून रिपरिप होणाऱ्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे.
पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले तर रस्त्यावर चिखल पसरल्याने दयनीय अवस्था झाली. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 42.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी यामध्ये सर्वाधिक पाऊस गडचिरोली तालुक्यात 98.8 मिलिमीटर तर 74.6 मिलिमीटर पावसाची भामरागड तालुक्यात नोंद झाली. पावसामुळे ताडगाव नाल्यावर पाणी चढल्याने आलापल्ली-भामरागड मार्ग काही काळासाठी बंद झाला.